मुंबई : तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोरोना लसीकरण उद्या पूर्णपणे बंद राहणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना लसीकरण परवा म्हणजे मंगळवारी 18 मे पासून पुन्हा सुरु होईल असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात चक्रीवादळाचा प्रभाव सौम्य असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या वस्त्यांबाबत सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करणे, पाणी तुंबण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी उदंचन संचाची व्यवस्था करणे, मुख्य 6 चौपाट्यांवर पूरबचाव पथके साधनसामुग्रीसह तैनात ठेवणे, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज ठेवणे आणि या अनुषंगाने नागरिकांना वेळोवेळी आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वेगाने वारे वाहण्याची शक्यता व पर्जन्यवृष्टीची संभाव्यता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 6 चौपाट्यांवर पूरबचाव पथके तैनात करण्याचे निर्देश मुंबई अग्निशमन दलास देण्यात आले आहेत. तसेच या सर्व ठिकाणी मुंबई पोलीसांच्या मोबाईल व्हॅन्स कार्यतत्पर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व चौपाट्यांवर नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
गाने वाहणारे वारे व पर्जन्यवृष्टी संभाव्यतेच्या पार्श्वभूमीवर वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालय क्षेत्रातील जनित्र व इतर आवश्यक ती पर्यायी व्यवस्था सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करुन घ्यावी. तसेच आवश्यक ती इंधन उपलब्धता देखील करवून घ्यावी, जेणेकरुन रुग्णांना देण्यात येणा-या सोयी सुविधांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.