सिंधुदुर्ग/रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेलं तोक्ते चक्रीवादळ आज कोकण किनारपट्टीवर आदळलं. चक्रीवादळाचे गंभीर परिणाम आता समोर येऊ लागले आहे. चक्रीवादळामुळे समुद्रातील लाटांनी रौद्र रुप धारण केल्याचे पहायला मिळाले. 80 ते 90 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यात अनेक घरांवरील छप्परं उडाली. अनेक फळबागा जमीनदोस्त झाल्यात. रस्त्यांवर झाडे पडल्याने अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या भागातील विज खंडीत झालीय.
रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीत दाखल झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे आता राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे मस्जिदीवरील पत्रे उडून गेल्याची माहिती आता समोर येत आहे. शिवाय, आंबोळगड, साखरीनाटे, जैतापूर या गावांमधील काही घरांवरी पत्रे देखील उडून गेले आहेत. जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित झाला असून नेटवर्कला देखील समस्या येत आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांवरती झाडे देखील उन्मळून पडली आहेत. देवरूखमधील एका घरावर झाड कोसळलं असून सुदैवानं या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अद्याप देखील चक्रीवादळाचा प्रभाव दिसत असून साधारण पाच वाजल्यानंतर किंवा चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर नेमकं नुकसान आणि परिस्थिती समोर येणार आहे. सद्यस्थितीत जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात साधारण 2 हजारच्या आसपास नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. समुद्रात देखील उंच लाटा उसळत आहेत. काही ठिकाणी घरांचं देखील नुकसान झाले आहे. सध्या 60 किमी प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहत आहेत.
सिंधुदुर्ग तोक्ते चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आज सकाळपासून घोंगावत होतं. रेडी ते विजयदुर्ग या 120 किलोमीटरच्या जिल्ह्यातील किनारपट्टीसह जिल्ह्यात सर्वच भागात चक्रीवादळामुळे नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील 70 ते 80 घरांचे नुकसान झाले असून अजूनही जिल्ह्यात 60 ते 70 किमी वेगाने वारे वाहत आहेत. जिल्ह्यातील अनेक मार्ग झाडं पडल्यामुळे बंद आहेत. तर घाटमाथ्याला जोडणारा आंबोली घाटात झाड व दरडी कोसल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. जिल्ह्यात 100 ते 110 घरांचे नुकसान झाले असून अजूनही जिल्ह्यातील किनारपट्टी भागात वादळ घोंगावत आहे. उद्याही जिल्ह्यात किनारपट्टी भागात वादळी वारे व समुद्र खवळलेला राहील. जिल्ह्यात रात्रीपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे वैभववाडी, देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे.
मालवण तालुक्यात ठिकठिकाणी झाड चक्रीवादळामुळे झाड रस्त्यावर पडलीत तर विजेचे खांबही रस्त्यावर पडल्यामुळे रस्ते बंद झालेत तर विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तिकडे सावंतवाडी तालुक्यात चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. सावंतवाडी नगरपालिकेचे छत कोसळून नुकसान झालं तर आंबोली घाटात दरड व झाड कोसळून घाटमार्ग काही काळ ठप्प झाला.
कणकवली तालुक्यालाही ‘तोक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा बसला. कणकवली तालुक्यातील अनेक घरांवर झाड पडली. काही ठिकाणी रस्त्यावर झाड कोसळून रस्ते अजूनही बंद आहेत. तर ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तर कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागात तोक्ते चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवला असून अनेक घराची छप्परं वाऱ्यामुळे उडून गेली. काही घरांवर झाड कोसल्यामुळे घरांच नुकसान झालं तर तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
तोक्ते चक्रीवादळाचा तडखा वैभववाडी तालुक्यातील सडूरे-शिराळे गावाला बसला आहे. अनेक घरांची कौले, पत्रे उडून गेल्याचे चित्र दिसत आहे तसेच काही आंबा, काजू, बागायतदारांचे कलम झाडे , फणस पडलेले आहेत. चक्रीवादळाच्या तडाखा तालुक्यातील अनेक काजु बागायदारांचे नुकसान झालं आहे.