मुंबई : कोरोना काळात रेमेडीसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असताना आता नव्या म्युकरमायकोसिस या आजारावर परिणामकारक असलेल्या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघा आरोपींना कापूरबावडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून विक्री करता आणलेले चौदा इंजेक्शन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई एका समाजसेवकाने दिलेल्या माहितीनंतर करण्यात आली. तसेच ही कारवाई कापूरबावडी पोलीस स्टेशन आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने कापूरबावडी परिसरात पार पाडली.
म्युकरमायकोसिस(ब्लॅक फंगस) साठी उपयुक्त असलेल्या एम्पोटेरेसिन-बी इंजेक्शनचा मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे देऊन विक्री करणाऱ्या दोघा आरोपींची माहिती स्थानिक समाजसेवक यांना मिळाल्यानंतर त्यांनी ती माहिती अतिरिक्त आयुक्त अनिल कुंभारे यांना दिली. संबंधित माहिती कुंभारे यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोठे मॅडम यांना दिल्यानंतर अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या पथकासोबत कापूरबावडी येथे 14 इंजेक्शन घेऊन आलेल्या आरोपी अमरदीप सोनवणे आणि आरोपी निखिल संतोष पवार यांना अटक केली. यातील आरोपी अमरदीप हा मुंबई महापालिकेच्या क्लिनिंग मार्शल म्हणून काम करीत आहे तर निखिल हा एका फार्मासिटिकल कंपनी मध्ये मेडिकल प्रतिनिधी असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.
म्युकरमायकोसिससाठी परिणामकारक असलेल्या एम्पोटेरेसिन-बी इंजेक्शनची मूळ किंमत 7806 रुपये असून हे दोन्ही आरोपी हे इंजेक्शन दहा हजार पाचशे रुपयांना एक असे विकत होते. दरम्यान त्यांनी एम्पोटेरेसिन-बी इंजेक्शन विकण्याकरता सोबत 14 इंजेक्शन घेऊन आले होते. पोलिस पथकांनी त्यांच्याकडून 14 इंजेक्शन हस्तगत केली. कापूरबावडी पोलीस अधिक तपास पोलिस करीत आहे.