Sylvester DaCunha Passed Away : जाहिरात उद्योगातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि अमूल गर्ल अटरली बटरलीचे जनक सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे मंगळवारी मुंबईत निधन झाले. त्यांच्या पाश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा राहुल डाकुन्हा असा परिवार आहे. अमूल कंपनीने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. त्यांनी लिहिले की, 'आम्ही अत्यंत दुःखाने कळवत आहोत की, काल रात्री मुंबईत डाकुन्हा कम्युनिकेशन्सचे चेअरमन सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे निधन झाले. ते भारतीय जाहिरात उद्योगातील एक दिग्गज होते. 1960 पासून अमूलशी जोडलेले होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सर्व अमूल परिवार सहभागी आहे. तसेच अमूल इंडियाचे जनरल मार्केटींग मॅनेजर पवन सिंग यांनी त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये सिल्वेस्टर डाकुन्हा यांना श्रद्धांजली वाहिली. "भारतीय जाहिरात जगतातील दिग्गज सिल्व्हेस्टर डाकुन्हा आता आपल्यात नाहीत हे जाणून खूप वाईट वाटले. जवळपास 3 दशकांहून अधिक काळ त्यांच्याकडून ब्रँड कम्युनिकेशन आणि जाहिरातींची कला मला शिकायला मिळाली ही माझासाठी अभिमानाची गोष्ट आहे"
अमूल गर्ल अटरली बटरली गर्लची संकल्पना कशी अस्तित्वात आली होती
अमूलची जाहिरात मोहीम 1966 मध्ये सुरू झाली होती. अमूलच्या यशामध्ये त्याच्या जाहिरात मोहिमेचा मोठा वाटा आहे. निळ्या रंगाचे केस, पांढरा आणि लाल डॉट फ्रॉक घातलेली अमूल गर्ल ब्रँडची ओळख बनलेली आहे. आजही भारतातील सर्वात मोठी दूध उत्पादक कंपनी म्हणून अमूलची लोकप्रियता जगात आहे. डाकुन्हा कम्युनिकेशन्स या जाहिरात कंपनीचे प्रमुख सिल्वेस्टर डाकुन्हा आणि युस्टेस फर्नांडिस हे अमूल गर्लचे निर्माते होते. त्या काळी पोल्सन डेअरी गर्लशी स्पर्धा करण्यासाठी एक अनोखा विचार समोर ठेऊन सिल्वेस्टर डाकुन्हा यांनी अमूल गर्लला अतिशय आकर्षकरित्या मैदानात उतरवले. ज्यावेळी या मुलीची संकल्पना सत्यात उतरवली गेली त्यावेळी सिल्व्हेस्टरची पत्नी निशा डाकुन्हा यांनी अमूलला 'अटरली बटरली अमूल' ही टॅगलाइन दिली. ही टॅगलाइन भारतीय जाहिरातींच्या सर्वात अविस्मरणीय टॅगलाइनपैकी एक आहे. तसेच ही अटरली बटरली गर्ल बातमीदारांवर विनोदी टिप्पण्या करण्याकरीता ही नावारूपास आलेली होती. अमूलने चालू घडामोडी लक्षात घेऊन त्या विषयांवर वन लाइनर बनवण्यासाठी लोकप्रिय ठरला होता. त्यांच्या या जाहिरातींसाठी लोकांनीही या ब्रँडला चांगलेच उचलून धरले होते. आजच्या घडीलाही अमूलची एक वेगळीच क्रेझ लोकांमध्ये आहे.
इतर महत्वाच्या बातम्या