Uttar Pradesh Election 2022 :  उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांतील 59 विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान समाजवादी पक्षाने ट्वीट करत निवडणूक आयोगाकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. मतदान सुरू झाल्यापासून पाच तासात समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून तब्बल 150 तक्रारी करण्यात आल्या. दर तासाला हा आकडा वाढत आहे. 


समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून सकाळी 8 वाजून 3 मिनिटाला पहिले ट्वीट करण्यात आले. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास 120 हून अधिक ट्वीट करण्यात आले. या ट्वीटमध्ये मतदान सुरू असेलल्या 59 विधानसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रावर गडबड सुरू असल्याचा आरोप पक्षाने लावला आहे. 


समाजवादी पक्षाने एका ट्वीटमध्ये समाजवादी पार्टीने आरोप करताना म्हटले की, कानपूर देहातमधील भोगनीपूरमधील 208 विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 121 वर समाजवादी पक्षाच्या चिन्हासमोरील बटण दाबले तरी व्हीव्हीपॅटवर भाजपचे चिन्हं दिसत आहे. निवडणूक निष्पक्ष आणि सुरक्षित व्हावे याची दक्षता निवडणूक आयोगाने घ्यावी अशी मागणी पक्षाने केली. 






समाजवादी पक्षाने ट्वीटमधून केलेली तक्रार भोगनीपूर जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे. अशा प्रकारचा कोणताही प्रकार घडला नसल्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी ट्वीट करून सांगितले. तर, कानपूरच्या जिल्हाधिकारी नेहा शर्मा यांनी सांगितले की, मतदानाची गोपनीयता भंग झाल्याची तीन प्रकरणे समोर आली असून कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 






 


करहलमध्ये भाजप उमेदवाराने धमकावले


मैनपुरी जिल्ह्यातील करहल विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारी एसपी सिंह बघेल यांनी पोलिंग एजेंट्सना धमकी दिली असल्याचा आरोप केला. केंद्रीय मंत्री प्राध्यापक एसपी सिंह बघेल आणि प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आमने सामने आहेत.






उत्तर प्रदेशमध्ये या तिसऱ्या टप्प्यात 2 कोटी 15 लाख 75 हजार 430 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 कोटी 16 लाख 12 हजार 010 पुरुष मतादर तर 99 लाख 62 हजार 324 महिला मतदारांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये 627 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.