मुंबई : वडिलांनी मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च वडिलांना परत मागता येईल का? सर्वसामान्यपणे कुणाचंही उत्तर नकारार्थीच असेल. पण मुंबईत एका बापाने चक्क आपल्या मुलाकडे त्याच्यावर केलेला शैक्षणिक खर्च मागितला, नुसता मागितलाच नाही तर त्यासाठी आपल्या मुलाला कोर्टातही खेचलं.
मुलाने खूप शिकावं, मोठं व्हावं यासाठी वडील वाट्टेल ते कष्ट घेतात. या वडिलांनीही मुलाला अमेरिकेत पाठवलं, खर्चाला हात आखडता घेतला नाही. मात्र अचानक वडिलांनी हा सगळा 29 लाखांचा खर्च परत मागितला. त्यासाठी मुलाला कोर्टात खेचलं. त्याविरोधात मुलाने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली.
वडिलांचा आईशी काडीमोड झाला, त्यावेळी मुलगा त्याच्या आईच्या पाठीशी उभा राहिला. त्यातून हा प्रकार घडल्याचं मुलाच्या वकिलांचं म्हणणं आहे. मुलाने आपल्या याचिकेत वडिलांना 15 लाख रुपये तीन टप्प्यात देण्याची तयारी दर्शवली, हे विशेष.
वडिलांनी आपल्या मुलासोबतचं नाते नाकारणं अतिशय दुर्दैवी असल्याचं मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मृदुला भाटकर म्हणाल्या. वडिलांनी मुलांना शिक्षण देणं, त्यांच्या शिक्षणावर आपल्या कुवतीप्रमाणे खर्च करणं हे पालक म्हणून त्याचं कर्तव्यच आहे. यामध्ये आर्थिक व्यवहाराचा प्रश्नच येत नाही, हा सारा खोडसाळपणा आहे. पालकांनी आपल्या शिक्षणावर असा खर्च केल्याबद्धल मुलांनी कृतज्ञ असलं पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं
बापलेकात शैक्षणिक खर्च परत मागण्यावरुन कोर्टात खटले येत असतील, तर ते समाजातील मूल्ये ढासळत असल्याचं लक्षण आहे, असं मत न्यायमूर्ती भाटकर यांनी व्यक्त केलं.
वडिलांनी मुलाकडे 29 लाखांचा शैक्षणिक खर्च परत मागितला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jan 2019 07:09 AM (IST)
मुलाच्या शिक्षणावर केलेला 29 लाखांचा खर्च वडिलांनी परत मागितल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी समाजव्यवस्था ढासळत असल्याची खंत व्यक्त केली आहे
प्रातिनिधीक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -