मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करताना अभिनेत्री रिचा चढ्ढाबाबत केलेले वादग्रस्त विधान मागे घेण्यास तयार आहोत. मात्र त्यासाठी काही अटीशर्ती असतील, असं सोमवारी पालय घोषच्या वकिलांनी हायकोर्टात स्पष्ट केलं. अभिनेत्री पायल घोषच्यावतीनं कोर्टाला सांगण्यात की आपण केलेलं विधान मागे घेत माफी मागण्यास तयार आहोत, मात्र त्यानंतर भविष्यात या कारणासाठी रिचा चढ्ढाला तिच्याविरोधात कोणतीही फौजदारी कारवाई करण्याचा अधिकार राहणार नाही. यावर हायकोर्टानं रिचाच्या वकिलांना बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच हमी देऊनही आज माफिनामा का सादर केला नाही? यावर पायलकडेही हायकोर्टानं विचारणा केली. त्यावर गेल्या सुनावणीनंतर रिचाच्यावतीनं ती कोर्टात केस जिंकली अशा आशयाच्या प्रतिक्रिया मीडियात देण्यात आल्या, अशी माहिती कोर्टात देण्यात आली. यावर न्यायमूर्ती अनिल मेनन यांनी दोन्ही बाजूंना हे प्रकरण सामंजस्यानं मिटवण्यासाठी बुधवारपर्यंत शेवटची संधी दिली आहे.


अजाणतेपणी जर कुणाची बदनामी झाली असेल तर त्यासाठी बिनशर्त माफी मागत हे प्रकरण संपवण्यास तयार असल्याची माहिती पायलच्यावतीनं अॅड. नितीन सातपुते यांनी कोर्टाला दिली आहे. यावर याचिकाकर्त्यांनीही समाधान व्यक्त केल्यानं बुधवापर्यंत सर्व प्रतिवाद्यांना सामंजस्यानं हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.


काय आहे प्रकरण?


ऑगस्ट 2013 मध्ये अनुराग कश्यपनं आपल्याला त्याच्या घरी बोलावून लैंगिक गैरवर्तणूक आणि अश्लील वर्तन केल्याचा आरोप पायलने जाहिररीत्या केली. याबाबत रितसर तक्रार दाखल केल्यानंतर त्याविषयी मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू असतानाच पायलनं 'रिचा चढ्ढा, हुमा कुरेशी आणि माही गिल या आपल्यासोबत कंफर्टेबल असतात' असं अनुराग कश्यपनं आपल्याला सांगितलं होतं असं वादग्रस्त विधान पायलनं एका मुलाखतीत केलं होता. पायलने केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि तथ्यहीन असून त्यामुळे माझी विनाकारण बदनामी होत असल्याचा दावा करत रिचा चढ्ढानं अॅड. सवीना बेदी आणि ज्येष्ठ वकील अॅड. वीरेंद्र तुळजापूरकर यांच्यामार्फत हायकोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.


हा व्हिडिओ दाखवणाऱ्या एबीएन तेलुगू या युट्युब वाहिनीला तसेच त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्या अभिनेता कमाल आर. खान यांनाही यात प्रतिवादी करण्यात आले आहे. या सर्व प्रतिवाद्यांना आक्षेपार्ह मजकूर पसरवण्यापासून तसेच तो प्रसारित करण्यापासून तातडीने मनाई करण्यात यावी, अशी विनंतीही रिचाने आपल्या याचिकेतून केली आहे. पायलच्या आरोपामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून प्रचंड अपमान, तिरस्कार, छळ, लोकांकडून होणारी छळवणूक आणि हसे याचा सामनाही करावा लागत आहे. या विधानामुळे आपल्याकडे येणाऱ्या संधींवरही नकारात्मक परिणाम होत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून आपल्याला प्रचंड ताण आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच, सर्व प्रतिवाद्यांकडून 1 कोटी 10 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी रिचाने याचिकेतून केली आहे.


इतर बातम्या