मुंबई : शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यातील बाळासाहेबांच्या स्मारकासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक' संस्थेला प्रतिवादी करण्याचे निर्देश मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले. तसेच या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.
महापौरांच्या निवासस्थानाच्याजागी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाविरोधात मानव जोशी यांच्या जनमुक्ती मोर्चा आणि भागवानजी रयानी यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मागील सुनावणीदरम्यान, आमचा बाळासाहेबांच्या स्मारकाला विरोध नसून त्यासाठी निवडण्यात आलेल्या जागेला आक्षेप असल्याचे याचिकाकर्त्यांनी सांगितले होते.
स्मारक उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेलाही आमचा विरोध असून सदर संस्था ही शासकीय आहे. तरीही या संस्थेत 11 पैकी पहिल्या पाचमध्ये कायमस्वरुपी सदस्य हे बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे, नातू आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार पूनम महाजन आणि वास्तूविशारद शशिकांत प्रभू यांचा समावेश आहे.
जर संस्था सरकारी आहे, मग त्यात खाजगी व्यक्तींची विश्वस्त म्हणून नेमणूक कशी करण्यात आली? यावरून ही संस्था सरकारी आहे का खासगी? असा सवालही याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे.