मुंबई : भायखळा महिला जेलमधील वॉर्डन मंजुळा शेट्ये हीच्या मृत्यूशी आपला काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा स्वाती साठे यांनी कोर्टात सादर केलेल्या उत्तरात दिला आहे. याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी डीआयजी - कारागृह स्वाती साठे, जेजे हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने, भायखळा जेलचे सुप्रिटेडंट चंद्रमणी इंदुलकर हे किला कोर्टात हजर होते. डॉ. लहाने आणि इंदुलकर यांना उत्तर देण्यासाठी 28 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

भायखळा जेलमध्ये 23 जून रोजी वॉर्डन मंजुळा शेट्ये हिच्या हत्येसंदर्भात याच जेलमधील कैदी मरियम शेख हिनं अॅडव्होकेट नितीन सातपुते यांच्यामार्फत याचिका दाखल करून वरील संबंधितांवर गंभीर आरोप केले आहेत.

स्वाती साठेंनी दाखल केलेल्या तीन पानी उत्तरात त्यांनी स्पष्ट केलं की, भायखळा जेलमधील या संपूर्ण प्रकाराशी आपला काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. कारागृह प्रशासनाच्या पश्चिम विभागाशी संबंधित असल्यानं त्यांचा दक्षिण विभागात मोडणाऱ्या भायखळा जेलच्या कारभाराशी सध्या काही संबंध नाही.

जेजेचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना आपण ओळखत नाही, तसेच त्यांच्याशी कधीही फोनवर बोलण झालं नाही, असा दावा स्वाती साठेंनी केला आहे. आपल्याकडे एकच मोबाईल नंबर असून माध्यमातून येणाऱ्या उलटसुलट बातम्याही खोट्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच एक जबाबदार अधिकारी या नात्यानं आपण तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचंही स्वाती साठेंनी कबूल केलं आहे.

मरियम शेखनं केलेल्या आरोपांनुसार, सदर घटनेनंतर स्वाती साठेंनी भायखळा जेलमधील मंजुळाच्या हत्येचे पुरावे नष्ट करण्यात आणि डॉ. लहानेंशी सातत्यानं संपर्कात राहून दोषींना वाचवण्यात मोलाची भुमिका बजावली, असा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सुरुवातीला ही घटना एक अपघात असल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांनी माध्यमांच्या दबावानंतर क्राईम ब्रांचकडे सोपवला. या प्रकरणी भायखळा जेलच्या जेलक मनिषा पोखरकर यांच्यासह 6 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.