नवी दिल्ली: केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेल्यानंतर, अनेकवेळा केशकर्तनकार केस कापून झाल्यावर हेड मसाज, नेक मसाज, बॉडी मसाज वगैरे करतो. केस कापल्या कापल्या हेअर ड्रेसरने तातडीने केलेल्या हेड मसाजमुळे आपल्याला बरं वाटतं.
डोक्यात विशिष्ट पद्धतीने मारणे, दोन्ही हाताच्या बोटांनी मसाज, त्यानंतर मानेचा मसाज , मान मोडणं वगैरे केलं जातं. पण यापुढे अशा मसाजपासून थोडी सावधानता बाळगा. कारण सलूनमध्ये जाऊन वारंवार मानेचा मसाज करणं, मान मोडणं एका व्यक्तीला महागात पडलं आहे.
मानेच्या शिरांना लकवा
सातत्याने मानेला झटका देऊन, मान मोडून घेतल्यामुळे, दिल्लीतील 54 वर्षीय अजय कुमार यांच्या मानेच्या दोन्ही शिरांना लकवा मारला आहे. इतकंच नाही त्यांना श्वसनाचा त्रास होत असून, त्यांना आता आयुष्यभरासाठी कृत्रिम श्वासोच्छवासाची मदत घ्यावी लागत आहे.
अजय कुमार हे नेहमीप्रमाणे सलूममध्ये गेले होते. तिथे त्यांनी सलूनवाल्याकडून मान मोडून घेतली. पण घरी आल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला.
त्यांना तातडीने डॉक्टरांकडे नेल्यानंतर, त्यांचं जे निदान झालं ते अत्यंत धक्कादायक होतं. मानेच्या ज्या शिरा श्वसनावर नियंत्रण ठेवतात, त्यांना लकव्याप्रमाणे झटका आला. त्यामुळे त्यांची श्वसनयंत्रणाच निकामी झाली, असं डॉक्टरांनी सांगितलं.
महत्त्वाचं म्हणजे सलूनमध्ये मानेला झटका देण्याचा प्रकार झाल्यामुळे श्वसनयंत्रणा निकामी झाल्याचं डॉक्टरांनी ठामपणे सांगितलं.
भारतासारख्या देशात सलूनमध्ये मान मोडण्याचा प्रकार सर्रास केला जातो. पण अशाप्रकारचा मसाज धोकादायक आहे, असं डॉक्टर वारंवार सांगत आले आहेत.
उपचाराची गुंतागुंत
अजय कुमार यांना मेदांता रुग्णालयात नेल्यानंतर त्यांच्यावर उपचाराला सुरुवात झाली. आधी त्यांनी हृदयविकारामुळे श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार केली होती. मात्र त्याबाबतच्या उपचारानंतर काहीच फरक पडला नाही. मग त्यांच्यावर निमोनियाचे उपचार झाले. तरीही त्यांना श्वसनाचा त्रास सुरुच होता.
डॉक्टरांना वाटलं की त्यांच्या मांसपेशी कमकुवत झाल्या असतील. पण न्यूरो उपचारावेळीही काहीही आढळलं नाही. त्यानंतर दुसऱ्या विभागात त्यांच्यावर उपचार सुरु झाले. अजय कुमार हे झोपून श्वास घेऊ शकत होते, मात्र त्यावेळी त्यांचं पोट खूपच आत ओढलं जात होतं.
विविध चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी अजय कुमार यांना दिनक्रमाबद्दल विचारलं. त्यावेळी अजय कुमार यांनी 2-3 आठवड्यातून सलूनमध्ये जाऊन मालिश आणि मान मोडून घेत असल्याचं सांगितलं.
त्यादरम्यान डॉक्टरांनी मानेच्याही चाचण्या केल्या होत्या. याच चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर अजय कुमार यांच्या मानेच्या दोन्ही शीरांना लकवा मारल्याचं उघड झालं.
सलूनमध्ये मान मोडण्याचा मसाज महागात, मानेच्या शिरांना लकवा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Sep 2017 04:30 PM (IST)
डोक्यात विशिष्ट पद्धतीने मारणे, दोन्ही हाताच्या बोटांनी मसाज, त्यानंतर मानेचा मसाज , मान मोडणं वगैरे केलं जातं. पण यापुढे अशा मसाजपासून थोडी सावधानता बाळगा.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -