ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या अँटी एक्सटॉर्शन सेलने अटक केली. पोलिसांनी इक्बालसह तिघांच्या मुसक्या आवळल्या.


या संपूर्ण घटनाक्रमात एका नावाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हे नाव आहे एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि ठाणे पोलिसांच्या अँटी एक्सटॉर्शन सेल अर्थात खंडणीविरोधी शाखेचे प्रमुख प्रदीप शर्मा. एकेकाळी मीडियात कायम चर्चेत असलेले प्रदीप शर्मा मोठ्या काळापासून जणू अज्ञातवासातच होते. पण एक महिन्यापूर्वी ऑगस्टमध्ये खाकी वर्दीत परतलेल्या प्रदीप शर्मा यांनी आपल्या सेकंड इनिंगची सुरुवात धडाक्यात केली.

गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेले 2008 मध्ये पोलिस दलातून निलंबित झाले होते. 56 वर्षीय प्रदीप शर्मा नऊ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पोलिस सेवेत परतले. प्रदीप शर्मा ऑगस्ट महिन्यात ठाणे पोलिसात रुजू झाले.

इक्बाल कासकरविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांकडे कामगिरी सोपवण्यात आली. रात्री नऊ ते सव्वानऊ वाजता प्रदीप शर्मा नागपाड्यात दाऊदची बहीण हसीनाच्या घरी पोहोचले आणि इक्बाल कासकरला बेड्या ठोकल्या.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर अटकेत

113 एन्काऊंटर
- 1983 बॅचचे पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा सर्व्हिस रेकॉर्ड वादांनी भरलेला आहे.
- प्रदीप शर्मा यांच्या नावावर 100 पेक्षा जास्त (113) एन्काऊंटरची नोंद आहे. 'अब तक 56' हा सिनेमात प्रदीप शर्मा यांच्यावर आयुष्यावर बनला होता.
- शिक्षकाचा मुलगा असलेल्या प्रदीप शर्मा यांच्या आयुष्यावर 'रेगे' नावाचा मराठी चित्रपटही बनला आहे.

गुन्हेगारांचा कर्दनकाळ-प्रदीप शर्मा
- एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा 1983 मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून मुंबई पोलिसात रुजू झाले होते.
- माहिम पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी नोकरीची सुरुवात केली. यानंतर काही वर्षांसाठी त्यांची बदली स्पेशल ब्रांचमध्ये झाली होती.
- प्रदीप शर्मा यांच्याकडे घाटकोपर आणि जुहू पोलिस स्टेशनचाही चार्ज होता.
- असं म्हटलं जातं की, त्यावेळी घाटकोपर पोलिस स्टेशनचा चार्ज घेण्यास कोणीही सहसा तयार होत नसे. पण प्रदीप शर्मा यांनी चार्ज घेतल्यानंतर गुन्हेगारांनी त्या परिसरापासून दूर राहणंच पसंत केलं.

अटकेवेळी इक्बाल केबीसी पाहत, बिर्याणी खात होता: पोलीस



मुंबईत प्रदीप शर्मा यांचा बोलबाला
- प्रदीप शर्मा यांनी मुंबईत पाऊल ठेवलं त्यावेळी गुन्हेगारी टोळ्यांनी हातपाय पसरले होते. दाऊद इब्राहिम, छोटा राजन यांसारखे मोठमोठे गुन्हेगार पोलिसांच्या हिट लिस्टवर होते.
- इथे येताच शर्मा यांनी आपली नजर गुन्हेगारांवर वळवली. त्यांनी गुन्हेगारांचं एन्काऊंटर केलं, यानंतर मुंबईत त्यांच्या नावाचा बोलबाला
झाला.
- मात्र 2008 मध्ये प्रदीप शर्मा यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप झाला. यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी प्रदीम शर्मांना मुंबई पोलिसातून निलंबित केलं होतं.
- निलंबनाविरोधात प्रदीप शर्मा यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादात आव्हान दिलं होतं. पण त्याचा निकाल येण्याआधीच 2010 मध्ये प्रदीप शर्मा यांना छोटा राजन टोळीतील लखन भय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात अटक झाली होती.
- जुलै 2013 मध्ये मुंबईतील कोर्टाने पुराव्यांअभावी त्यांची या आरोपातून सुटका केली. अखेर 17 ऑगस्ट 2017 रोजी ते ठाणे पोलिसात रुजू झाले.
- प्रदीप शर्मा यांच्या नावावर 100 हून अधिक एन्काऊंटरचा रेकॉर्ड आहे, ज्यात लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचाही समावेश आहे.

जन्म आग्र्यातला, धुळ्यात शिक्षण
- प्रदीप शर्मा यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये झाला होता. त्यांचे वडील महाराष्ट्रातील धुळ्यात हिंदी मीडियम शाळेचे मुख्याध्यापक होते.
- त्यांनी एमएससीपर्यंतचं शिक्षण धुळ्यातूनच पूर्ण केलं. यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाची परीक्षा दिली. पास झाल्यानंतर त्यांची महाराष्ट्र पोलिसात निवड झाली.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा 9 वर्षांनंतर पुन्हा पोलिस सेवेत दाखल

गँगस्टर विनोद मातकरच्या एन्काऊंटरमुळे प्रसिद्धी
- क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक असलेल्या प्रदीप शर्मा यांनी कुख्यात गँगस्टर विनोद मातकरचा एन्काऊंटर केल्यानंतर ते एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध झाले.
- विनोद मातकरशिवाय प्रदीप शर्मा यांनी परवेझ सिद्दीकी, रफीक डब्बावाला, सादिक कालिया या गुन्हेगारांचा एन्काऊंटर केला.
- यानंतर मुंबईला हादरवण्याचा कट रचणाऱ्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा एन्काऊंटर केला.
- प्रदीप शर्मा यांच्यानुसार, त्यांनी आपल्या 25 वर्षांच्या नोकरीत 112 पेक्षाही जास्त एन्काऊंटर केले आहेत.