मुंबई : विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर आली आहे. एकीकडे मुख्यमंत्री विकास यात्रा काढणार आहेत तर आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. पण काँग्रेस मात्र अजून ही निराशेच्या गर्तेत असल्याचं चित्र आहे.


नुकतीच मंगल प्रभात लोढा यांची भाजप मुंबई अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मुंबईत विधानसभा निवडणुकीत 36-0 करुन दाखवा असे लोढा यांना सांगितलं. मुंबईतील 36 जागांवर भाजप आक्रमक असताना मुंबई काँग्रेस मात्र अजून ही अध्यक्षांच्या प्रतीक्षेत आहे.

लोकसभा निवडणूक असताना संजय निरुपम यांच्याकडून मुंबई काँग्रेसची धुरा मिलिंद देवरा यांना देण्यात आली. त्यांनी पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिला. त्यामुळे मुंबईत सध्या झालेले अनेक अपघात, जीवितहानी अशा वेळी सरकारला धारेवर धरायला मुंबई काँग्रेसचा नेता दिसला नाही. मालाडमध्ये भिंत कोसळून लोकांचा मृत्यू झाला, तर डोंगरीत इमारत कोसळून लोकांचे जीव गेले. मॅनहोलमध्ये पडून मुलांचे जीव गेले, अशावेळी सत्ताधारी भाजप-शिवसेनेला जाब विचारण्याऐवजी मुंबई काँग्रेसचे नेते एकमेकांशी ट्विटरवरून भांडताना दिसत होते.

त्यामुळे विधान सभा निवडणुकीत मुंबई काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न अजून ही अनुत्तरित आहेत. महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस वेणूगोपाल कर्नाटकातील सरकार वाचवण्याच्या गडबडीत असल्याने मुंबई काँग्रेसचा निर्णय प्रलंबित आहे.

मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे की मिलिंद देवरा मुंबई अध्यक्षपदी कायम राहणार असून महाराष्ट्र काँग्रेसप्रमाणे त्यांनाही दोन कार्याध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ गायकवाड आणि हुसेन दलवाई या नेत्यांची नावं कार्याध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. विविध समाजाला प्रतिनिधित्व द्यावे आणि सामूहिक जबाबदारी या दृष्टीतून या नेमणुका होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे.

पण प्रश्न हाच उरतो एकीकडे सगळ्या जागा जिंकण्याच्या जोशात असलेली भाजप आणि शून्यातून बाहेर न येण्याच्या मनस्थितीत असलेली मुंबई काँग्रेस पाहता, रणांगणावर पोहचण्याआधीच काँग्रेसने शस्त्र टाकल्याचे चित्र आहे.