नवी मुंबई : नवी मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये काही अनोळखी चेहरे घुसल्याची शंका मराठा नेते आणि आमदार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. एबीपी माझाशी बोलताना पाटील यांनी या आंदोलनात उपरे आंदोलक घुसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हे आंदोलन पेटवण्यासाठी भाडोत्री माणसे पाठवली का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.


आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु होतं. ठरल्याप्रमाणे एकदिवसीय बंद जाहीर करण्यात आला होता. बंद यशस्वी झाला, त्यामुळे पुढची दिशा ठरवण्यासाठी आपल्याला वेळ द्यायला हवा असं आवाहन त्यांना आंदोलनकर्त्यांना केलं.  मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका आंदोलनातील नवीन चेहऱ्यांनी घेतली, असं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.


सरकार मराठा समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुण नाराज असून ते कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, ही वस्तुस्थिती आहे, असंही आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.


नवी मुंबई ठाण्यात आंदोलनाला हिंसक वळण


मराठा मोर्चा समन्वयकांनी मुंबईत आंदोलनाला स्थगिती दिल्यानंतर तिकडे नवी मुंबई आणि ठाण्यात आंदोलक आक्रमक दिसत होते. नवी मुंबईतल्या कळंबोलीत आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. आंदोलकांनी पोलिसांच्या दोन गाड्यांना आग लावली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे मुंबई-पुणे महामार्ग जवळपास 6 तास दोन्ही बाजूनं बंद आहे.


मुंबई बंद स्थगित


मराठा आरक्षणासाठी पुकारलेला  मुंबई बंद  अखेर स्थगित करण्यात आला आहे. मराठा क्रांती सकल मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी आज (25 जुलै) दुपारी दादरमध्ये पत्रकार परिषद घेऊन बंद स्थगित केल्याची घोषणा केली. तसंच ठाणे आणि नवी मुंबई बंदही स्थगित करण्याचं आणि शांततेचं आवाहन समन्वयकांनी आंदोलकांना केलं आहे.


सरकारने दोन वर्ष मराठा समाजाची पिळवणूक, फसवणूक केली. त्यामुळे आता मूक नाही तर ठोक मोर्चा काढण्याचा निर्धार केला. मराठा समाजाचा अपमान आणि अन्यायाविरुद्ध हा बंद पुकारल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितलं.


"सरकारमुळे आमच्या हातात दगड, काठ्या आल्या. काही जणांना त्रास झाला, त्यांची क्षमा मागतो, पण सरकारने याची दखल घ्यायला हवी. राजकीय हेतूने बंद पेटल्याचा संशय आहे," असंही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आलं.


मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने काल 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर आज म्हणजे 25 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आली होती.


कुठे गाड्या पेटवल्या, कुठे दगडफेक


मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला ठिकठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी सायन-पनवेल हायवेवर कळंबोलीजवळ पोलिसांची दोन गाड्या पेटवल्या. तर साताऱ्यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये साताऱ्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील जखमी झाले आहेत.


सायन-पनवेल हायवेवर आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या पेटवल्याने, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. या संपूर्ण आंदोलनामुळे मुंबई-पुणे महामार्ग दोन्ही बाजूनं बंद आहे.


मुंबईतल्या मुलुंडमध्ये मराठा मोर्चा आंदोलकांनी गाडीच्या टायरची जाळपोळ केली. त्यावेळी मुंबई पोलिसांनी टायरपासून आंदोलकांना बाजूला सारत जळालेले टायर विझवण्याचे प्रयत्न केले. ठाण्यातल्या माजीवाडा ब्रिजजवळही आंदोलकांनी गाड्यांचे टायर जाळले.


मानखुर्द: मानखुर्दजवळ आंदोलकांनी बेस्टच्या बसची तोडफोड केली आणि त्य़ानंतर बस पेटवली. अग्निशमन दलानं वेळीच घटनास्थळी दाखल होत बसची आग विझवली.