मुंबई : मुंबईतील नामांकित सेंट झेवियर्स कॉलेजला पहिल्यांदाच ख्रिस्ती समाजाबाहेरील प्राचार्य लाभणार आहेत. मराठमोळे राजेंद्र शिंदे हे झेवियर्स महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळणार आहेत.


झेवियर्स कॉलेजमध्ये आतापर्यंत ख्रिश्चन समाजातील प्राचार्यांनीच पदं भूषवली आहेत. मात्र दीडशे वर्षांच्या इतिहासात सेंट झेवियर्स कॉलेजला पहिल्यांदाच बिगरख्रिस्ती प्राचार्य मिळणार आहेत.

राजेंद्र शिंदे पहिले मराठी प्राचार्य म्हणून 1 सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत. सध्या झेवियर्स कॉलेजच्या प्राध्यापकांमध्ये  सर्वात अनुभवी असलेल्या राजेंद्र शिंदे यांचं नाव प्राचार्य म्हणून जाहीर करण्यात आलं.

राजेंद्र शिंदे यांनी वनस्पतिशास्त्र (बॉटनी) विषयात पीचडी केली असून ते झेवियर्स महविद्यालयात वनस्पतिशास्त्र विषयाचे विभागप्रमुख म्हणून काम पाहत होते. 1 सप्टेंबरला राजेंद्र शिंदे हे झेवियर्स कॉलेजचे 24 वे प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.