सरकारने दोन वर्ष मराठा समाजाची पिळवणूक, फसवणूक केली. त्यामुळे आता मूक नाही तर ठोक मोर्चा काढण्याचा निर्धार केला. मराठा समाजाचा अपमान आणि अन्यायाविरुद्ध हा बंद पुकारल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितलं.
"सरकारमुळे आमच्या हातात दगड, काठ्या आल्या. काही जणांना त्रास झाला, त्यांची क्षमा मागतो, पण सरकारने याची दखल घ्यायला हवी. राजकीय हेतूने बंद पेटल्याचा संशय आहे," असंही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आलं.
मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने काल 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर आज म्हणजे 25 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आली होती.
कुठे गाड्या पेटवल्या, कुठे दगडफेक
मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला ठिकठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी सायन-पनवेल हायवेवर कळंबोलीजवळ पोलिसांची दोन गाड्या पेटवल्या. तर साताऱ्यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये साताऱ्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील जखमी झाले आहेत.
सायन-पनवेल हायवेवर आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या पेटवल्याने, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. या संपूर्ण आंदोलनामुळे मुंबई-पुणे महामार्ग दोन्ही बाजूनं बंद आहे.
मुंबईतल्या मुलुंडमध्ये मराठा मोर्चा आंदोलकांनी गाडीच्या टायरची जाळपोळ केली. त्यावेळी मुंबई पोलिसांनी टायरपासून आंदोलकांना बाजूला सारत जळालेले टायर विझवण्याचे प्रयत्न केले. ठाण्यातल्या माजीवाडा ब्रिजजवळही आंदोलकांनी गाड्यांचे टायर जाळले.
मानखुर्द: मानखुर्दजवळ आंदोलकांनी बेस्टच्या बसची तोडफोड केली आणि त्य़ानंतर बस पेटवली. अग्निशमन दलानं वेळीच घटनास्थळी दाखल होत बसची आग विझवली.
बीड: गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर आणि ऑफिसवर आंदोलनकांनी दगडफेक केली.
अहमदनगर - नगर जिल्ह्यातील कर्जत येथे आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. आंदोलकांनी वन विभागाची जिप पेटवली.
नाशिक - नाशिकरोड परिसरात आंदोलनाला हिंसक वळण.अनेक दुकानांसह एटीएमची तोड़फोड़ केली. बिटको पॉइंट, दत्त मंदिर चौकात तोडफोड.
बारामती: संतप्त मराठा समाजाच्या तरुणांनी रस्ता रोको करत टायर जाळले, तर मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. इंदापूरमध्ये ठिय्या आंदोलन, सुरवड गावी एस टी बस फोडली
काय आहेत मागण्या?
1. राज्य सरकार करत असलेल्या मेगा भरती स्थगित करावी. मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय भरती करु नये.
2. अशा प्रकारचे आश्वासन सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी लेखी द्यावे.
3. कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यात यावी.
शरद पवार यांची प्रतिक्रिया
मराठा आंदोलकांच्या असंतोषाला आणि चिघळलेल्या परिस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री विषयाचे गांभीर्य समजण्याऐवजी चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. ही बाब खेदजनक असल्याचे पवारांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र बंद
मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने 24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती.
काल सकाळी 11 च्या सुमारास काकासाहेब शिंदे यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार झाले. लहान भाऊ अविनाश शिंदेने काकासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
सकल मराठा मोर्चाच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात खबरदारी म्हणून शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आली. बीडमधल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बंदमुळे शहरातून एकही बस शहराबाहेर पडू शकलेली नाही. दररोज बीडमधून ये-जा करणाऱ्या 431 बस फेऱ्या काल बंद होत्या. काही ठिकाणी टायर जाळण्यात आल्यानं एसटी महामंडळानं वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
परभणी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांनी रास्तारोको केला. यामुळे काही काळ सचखंड , परळी पॅसेंजर आणि हैदराबाद पॅसेंजर ट्रेन रोखण्यात आली होती. रुळावर बसून आंदोलकांनी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणा दिल्या.
उस्मानाबादमध्येही काल कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. उस्मानाबाद येथील जिल्हा विधीज्ञ मंडळाने एकमतानं मराठा मोर्चाला पाठिंबा दिला. यासोबत नांदेडसह अनेक तालुक्यांमध्ये बंद पाळला जात आहे.
चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
जे आपल्या हातात नाही त्यासाठी आंदोलन करुन उपयोग होणार नाही. मंत्र्याच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा. आज पंढरपूरमध्ये 7 लाख वारकरी अडकून आहेत. 10 लाख काय 10 कोटी देऊन काकासाहेब शिंदेच्या कुटुंबाची भरपाई करता येणार नाही. बसेस फोडून आरक्षण मिळणार आहे काय? काही पेड लोक या आंदोलानात घुसली आहेत, त्यांना हे आंदोलन बदनाम करायचे आहे. निवडणूक काळात हे प्रकार वाढणार आहेत. पण आंदोलकांनी या पेड लोकांना खड्यासारखे बाजूला करावे, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
औरंगाबादमध्ये आंदोलकाचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका गावात एका मराठा आंदोलकानं गोदावरी नदीत उडी मारली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. काकासाहेब शिंदे असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव आहे. काकासाहेब शिंदे याला मच्छीमारांनी नदीपात्रातून बाहेर काढले. त्यानंतर गंगापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर गंगापूर पोलीस ठाण्यासमोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होत नाही, तोवर मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका मृत काकासाहेब शिंदेच्या भावानं घेतली आहे.
काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करुन त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत मेगाभरती रोखावी, स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी केल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
औरंगाबादमधील मराठा आंदोलनकर्त्याच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुख व्यक्त केलं आहे. शिवाय मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
मृत काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला सर्वोतपरी मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कुठलीही हिंसा किंवा अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष करु नये : संभाजीराजे
औरंगाबादमधील मराठा आंदोलकाच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा समाजाच्या भावना किती तीव्र आहेत हे मी समजू शकतो, असे संभाजीराजे म्हणाले.
तसेच, संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना आवाहनही केले. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, कुठलाही वेळ न दवडता त्यांनी आंदोलकांशी तातडीने चर्चा करावी. केवळ टीव्हीमध्ये आपली बाजू न सांगता मराठा समाजाच्या सर्व घटकांना सर्व नेत्यांना एकत्र बोलावून त्यांच्याशी वन-टू-वन चर्चा करावी. यासंदर्भात सरकारी पातळीवर जे जे शक्य आहे ते करण्यासाठी तातडीने मिटिंग बोलवावी.”