मुंबई : विद्यापीठ सिनेट निवडणुकांसदर्भातली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) फेटाळाली आहे. तसेच मुंबई विद्यापीठाकडून (Mumbai University) जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुकांच्या कार्यक्रमावर हायकोर्टानं शिक्कामोर्तब केलंय. नव्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देत ही याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान यावर उच्च न्यायालयाने आता निकाल दिलाय. परंतु तपशीलवार आदेश अपलोड झाल्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर आव्हान देणार, असं याचिकाकर्ते सागर देवरे यांनी म्हटलं.
मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट मतदारसंघाच्या निवडणुकीवरून काही दिवसांपूर्वी राजकीय रणकंदन सुरु झाले होते. मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान सिनेट निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला होता. तर, विद्यापीठाच्या या आदेशाविरोधात सागर देवरे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. ही याचिका आता उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
मुंबई विद्यापीठाकडून निवडणुकांचे वेळापत्र जाहीर
दरम्यान ही याचिका दाखल करण्यात आल्यानंतर मुंबई विद्यापीठाने सुधारित संभाव्य निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान सिनेट निवडणुकांसाठी नव्याने मतदार नोंदणी करावी लागणार होती. त्यानंतर 21 एप्रिल 2024 रोजी सिनेट निवडणूक घेतली जाणार आहे. 24 एप्रिलला या सिनेट निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल, असं विद्यापीठाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकात सांगण्यात आलं आहे.
असे असणार सुधारित सिनेट निवडणुकांचे वेळापत्रक
- 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023- नोंदणीकृत पदवीधर मतदार नोंदणी अर्ज भरण्याची तारीख
- 1 डिसेंबर 2023 ते 25 फेब्रुवारी 2024- मतदार नोंदणी अर्ज छाननी, आक्षेप व मतदार यादी प्रसिद्धी
- 26 फेब्रुवारी 2024 - अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार
- 29 फेब्रुवारी 2024 - निवडणूक अधिसूचना जाहीर करणार
- 11 मार्च 2024 - उमेदवारी अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक
- 18 मार्च 2024-उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंबंधी लेखी कळविण्याची दिनांक
- 20 मार्च - उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक
- 21 एप्रिल 2024 - सिनेट निवडणूक पार पडणार ( सकाळी 9 ते सायंकाळी 5 )
- 24 एप्रिल 2024 - मतमोजणी पार पडणार
सिनेट निवडणुकांवरुन आरोप प्रत्यारोप
दरम्यान या सिनेट निवडणुकांवरुन राजकीय वर्तुळात देखील वातावरण चांगलंच पेटलं होतं. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीवरून शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. भाजप नेते आशिष शेलार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेली विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मतदार यादीविरोधात पत्र लिहिले होते. या मतदार यादीतील मतदारांवर शंका उपस्थित करण्यात आली होती. या पत्रानंतर राज्य सरकारने विद्यापीठाला पत्र लिहून निवडणूक स्थगित करण्याचे निर्देश दिले होते.
हेही वाचा :