Mumbai University Senate Election: मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) आणि विद्यापरिषदेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी रात्री जाहीर झाला. या निवडणुकीत प्राध्यापकांच्या मतदारसंघातून बॉम्बे युनिर्व्हसिटी अॅण्ड कॉलेज टीचर्स युनियनने (बुक्टू) आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. बुक्टूने सिनेट (अधिसभेच्या) च्या सर्व म्हणजे 10 जागा तर विद्यापरिषदेच्या 6 पैकी 3 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी सिनेटच्या 8 तर विद्यापरिषदेच्या  तीन जागा जिंकून बुक्टूने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. बुक्टूला 'मुक्ता' आणि 'मस्ट' या संघटनांनी आव्हान दिले होते. मुक्ता आणि मस्ट या संघटनांचे प्रत्येकी एक-एक उमेदवार विजयी झाला. मतदार यादीच्या घोळापासून ते निवडणूक प्रचारात झालेले आरोप प्रत्यारोपाने ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती. 


विद्यापरिषदेच्या आठपैकी सहा जागांवर निवडणूक पार पडली. यातील दोन विभागांसाठी निकष पूर्ण करणारे उमेदवार न मिळाल्याने या जागा रिक्त ठरल्या. तर उर्वरीत सहा जागांपैकी तीन जागांवर बुक्टूने निवडणूक लढवली आणि विजयी झाले. तर तीन जागांवर इतर उमेदवार बिनविरोध निवडून आले.


मुंबई विद्यापीठाची सिनेट अतिशय महत्त्वाची समजली जाते. मागील अनेक दशकांपासून मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर बुक्टूचे वर्चस्व आहे. विद्यापीठ कायद्यातील बदलानुसार लागू झालेल्या निवडणुकीतही बुक्टूने आपली विजयी परंपरा कायम राखली आहे. यंदाच्या सिनेट निवडणुकीतील मतदार यादीचा घोळ चांगलाच गाजला. जवळपास 600 प्राध्यापक-शिक्षकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याने गदारोळ झाला होता. निवडणुकीत प्रचाराच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोप झाले होते.  बुक्टूचा पराभव करण्यासाठी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सत्तापक्षातील अनेक मंत्री, आमदार, नगरसेवक व स्थानिक नेते प्रचारात उतरून गैरमार्गाचा अवलंब केल्याचा आरोप बुक्टूने केला होता. बुक्टूविरोधात 'मस्ट' ही शिक्षक संघटना आणि 'मुक्ता' या संघटनांनी कंबर कसली होती. मुक्ता या संघटनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे आमदार, नेत्यांनीदेखील प्रयत्न केले असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू होती. मात्र, विरोधी संघटनांचे कडवं आव्हान बुक्टूने मोडून काढत यश मिळवले. तर, मुक्ता आणि मस्ट या संघटनांचे प्रत्येकी एक-एक उमेदवार विजयी झाला.


शिक्षणक्षेत्रात गेली सहा दशके अनेक प्रश्नावर शासन -प्रशासनाशी भिडणाऱ्या बुक्टू संघटनेलाच मतदारांनी निर्विवाद पसंती देत विरोधकांना धूळ चारल्याचे सिद्ध झाले असल्याची प्रतिक्रिया बुक्टूचे अध्यक्ष प्रा. डॉ. गुलाबराव राजे यांनी दिली. शिक्षक-प्राध्यापकांनी दाखवलेल्या विश्वासासाठी बुक्टूच्या प्रचार प्रमुख डॉ. तपती मुखोपाध्याय, बुक्टू सचिव डॉ. मधू परांजपे यांनी सर्व प्राध्यापकांचे आभार मानले आहेत. 



निवडणूक जिंकलेले बुक्टूचे उमेदवार खालीलप्रमाणे



सिनेट :
1. महिला राखीव : प्रा. शांती पोलामुरे
2. अनु. जाती. : डॉ. सोमनाथ कदम
3. अनु. जमाती : डॉ. सखाराम डाखोरे
4. डी टी /एन टी : प्रा. जगन्नाथ खेमणार
5. ओ बी सी : प्रा. हनुमंत सुतार


खुला गट :
6. प्रा. चंद्रशेखर कुलकर्णी
7. प्रा. डॉ. सत्यवान हानेगावे
8. प्रा. जितेंदर झा.


विद्यापरिषद (Academic Council):
1. विज्ञान व तंत्रज्ञान : खुला : प्रा. डॉ. तनुजा सरोदे.
2. विज्ञान व तंत्रज्ञान : अनु. जाती.: प्रा. डॉ. संजय सोनावले
3. मानव्यशास्त्र : खुला : प्रा. डॉ. माधवी निकम.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI