मुंबई : क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या लग्नाबद्दल कुणाला कळू नये म्हणून आपली नावं बदलली होती, अशी माहिती स्वत: अनुष्का शर्मा हिने दिली आहे. अनुष्का आणि विराट यांचा 2017 वर्षाच्या अखेरीस इटली येथे लग्नसोहळा पार पडला होता. विराट आणि अनुष्का यांच्या लग्नात एकूण 42 पाहुणे उपस्थित होते. ज्यामध्ये त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्र होते.

एका मुलाखतीदरम्यान अनुष्काने हा खुलासा केला आहे. ती म्हणाली, "आम्हाला लग्न खासगी आणि घरगुती ठेवायचं होतं. तसेच आम्हाला इतर सेलिब्रेटींसारखं मोठं लग्न करायचं नव्हतं. आमच्या लग्नाबद्दल कोणाला माहित होऊ नये यासाठी आम्ही आपली नावं बदलली होती. आम्ही केटर्सना खोटी नावं सांगितली होती. विराटने त्याचं नाव राहुल ठेवलं होतं, अशी माहिती अनुष्काने दिली आहे.

मागील काही वर्षांपासून मी कामात खूप व्यस्त असायचे. मात्र लग्नानंतर मी माझ्यासाठी जे महत्वाचं आहे, त्यासाठी वेळ काढत आहे. विराटसोबत वेळ घालवनं हे माझ्यासाठी खास असतं. मात्र आम्ही एकावेळी एकाच ठिकाणी खूप कमी असतो, अशी खंतही अनुष्काने व्यक्त केली.

विराट आणि अनुष्का 11/12/2017 रोजी लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यांचा लग्नसोहळा इटलीत पार पडला होता. या लग्नसोहळ्याला अगदी जवळचे नातेवाईक आणि मित्रांना निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी भारतात भव्य रिसेप्शन ठेवलं होतं. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती.