मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंचा पक्ष मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत सामील होऊ शकतो, अशा चर्चा आहेत. मात्र आता राष्ट्रवादी मनसेला कल्याण लोकसभेची जागा देण्यास तयार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक गेल्या काही दिवसांत चर्चेचा विषय होती. यातच राष्ट्रवादी मनसेला लोकसभेची एक जागा देण्यासाठी काँग्रेसलाही गळ घातल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सोमवारपर्यंत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाआघाडीत कोणकोणते पक्ष सहभागी होणार आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल.


VIDEO | राष्ट्रवादीकडून मनसेचं 'कल्याण'? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



राजू पाटील किंवा रमेश पाटील यांना उमेदवार मिळण्याची शक्याता 


सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर राष्ट्रवादीनं मनसेला आपल्या कोट्यातील कल्याणची जागा सोडल्याचं कळत आहे. या जागेवर मनसेकडून राजू पाटील किंवा त्यांचे भाऊ रमेश पाटील हे उमेदवार असू शकतात. यासोबत मनसेला आणखी एका जागेची अपेक्षा आहे. यासाठी राष्ट्रवादीची काँग्रेससोबत बोलणी सुरु आहे. याचा निर्णय येत्या सोमवारपर्यंत होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.


मनसेला महाआघाडीत घेण्यास काँग्रेसचा सुरुवातीपासून विरोध होता. मात्र मोदी विरोधकांनी एकत्र येण्याचं आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केल्यानंतर मनसेच्या महाआघाडीत येण्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या. मोदी विरोधकांसाठी आमची दारं सदैव उघडी असतील, असं राहुल गांधींनी मुंबईतील सभेत म्हटलं होतं.


काँग्रेस मात्र दोन हात लांब


काँग्रेस मात्र राज ठाकरे यांना आपल्या कोट्यातून एकही जागा देणार नसल्याच्या चर्चा आहेत. मनसेचा मुंबईतील उत्तर भारतीयांना विरोध हे याचं प्रमुख कारण आहे. मात्र यावर उपाय म्हणून राष्ट्रवादीच्या कोट्यातून मनसेला जागा देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. मनसेच्या स्थापनादिनी 9 मार्चला राज ठाकरे याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.