मुंबई : आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) सरकारने गुजरात राज्यातील गांधीनगरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गांधीनगर येथे हलवण्याचा निर्णय केव्हा झाला एकदा पाहिलं पाहिजे. माझ्या माहितीनुसार हा निर्णय आमच्या सरकारमध्ये झाला नसावा. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही प्रयत्न नाही. याउलट मुंबईच्या आणखी विकासाकरता केंद्र सरकारने वेळोवेळी अनेक योजना आणल्या आहेत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. नितीन गडकरी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते.


अशा प्रकरची राजकीय चर्चा योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आम्ही सर्वजण महाराष्ट्र सरकारच्या मागे उभे आहोत. महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करावा. केंद्र सरकार नेहमी त्यांच्या पाठिशी आहे. राजकारण करण्यासाठी भविष्यात खूप वेळ आहे. सध्या कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढण्याची गरज असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं.


कोरोनाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून योग्य ती काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे. कोरोना व्हायरसचा प्रादर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता बाळगली पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, सरकारने दिलेल्या गाईडलाईन्स पाळल्या पाहिजेत. देशातील राष्ट्रीय महामार्ग सुरु झाले आहेत, आयात-निर्यात सुरु झाली आहे, उद्योगधंदे सुरु करण्याचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेतला जात आहे, काही रेल्वे गाड्याही सोडल्या आहेत. त्यामुळे कोरोनाशी लढताना जीवन कसं जगायचं हे शिकणेही आवश्यक आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.


मुंबईत येणारे लोंढे कमी केले पाहिजेत


मुंबई तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेली आहे, त्यामुळे याठिकाणी काही मर्यादा आहेत. त्यामुळे मुंबईत येणारे लोंढे कमी केले पाहिजेत. त्यासाठी मुंबईतील उद्यागांचं विकेंद्रीकरण करणे गरजेचं आहे. मुंबईत बाहेरुन लोक ज्या पद्धतीने येतात आणि राहतात ते आदर्श नाही. यामुळे मुंबईचा धोका वाढत आहे. सर्व गोष्टी बाजूला ठेऊन मुंबईच्या विकासाचा आणि भविष्याचा विचार सर्व राजकीय मंडळींनी केला पाहिजे. भविष्यातील मुंबई कशी असावी यासाठी योग्य नियोजन केलं पाहिजे. मुंबईतील काही उद्योग ठाणे आणि ठाण्यातील ग्रामीण भागात, कोकणात हलवले पाहिजेत. याशिवाय नवीन शहरं विकासीत करण्यासाठी मुंबईतील उद्योगपतींनी पुढे आलं पाहिजे. मी मुंबई किंवा पुण्याच्या विरोधात नाही, मात्र अडचणी लक्षाच घेऊन पुढची योजना ठरवली पाहिजे असं माझं मत आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.


शेतकऱ्यांनी तेलबियांची लागवड करावी

शेतकरी संकटात आहे, शेतकऱ्याच्या मालाला मार्केट उभं करुन देणे गरजेचं आहे. देशात अन्नधान्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी गहू, तांदूळ, कापसाला पर्याय म्हणून तेलबियांची लागवड करावी. जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. तेलबियांची लागवड करुन महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला नवी दिशा देता येईल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.