वसई : चाईल्ड हेल्प फाउंडेशनच्या नावाखाली अपंग मुलामुलींना भीक मागायला लावून फंड गोळा करायला लावणाऱ्या संस्थेचा नालासोपाऱ्यात भांडाफोड झाला आहे. डोनेशनच्या नावाखाली दिवसाला हजार ते दीड हजार रुपये गोळा नाही केले, तर अपंग मुलामुलींना बेदम मारहाण केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव पीडित मुलीच्या तक्रारीनंतर उघड झाले आहे. याबाबत मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अमन पांडे या संस्थेच्या मॅनेजरला अटक केले आहे.

प्रिसीला इम्यानियुल या 20 वर्षाच्या अपंग असलेल्या तरूणीच्या तक्रारीवरून या प्रकरणाचा तपास आता तुळींज पोलीस करत आहेत. प्रिसीलाचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले आहे. वडील निवृत्त आहेत तर आई मयत झाली आहे. आपल्या वडिलांना आपला हातभार लागावा म्हणून मागच्या 15 दिवसांपासून तिने नालासोपाऱ्यातील चाईल्ड हेल्प फाउंडेशन या संस्थेत काम सुरू केलं होतं. तिला तिथल्या अमन पांडे या मॅनेजरने 8 हजार रुपये पगार देण्याचे आश्वासनही दिलं होतं. त्याप्रमाणे ती या संस्थेत काम करीत होती. पण ती कामावर हजर झाल्यानंतर तिला चाईल्ड हेल्प फाउंडेशनसाठी डोनेशन गोळा करण्यास सांगितले.

नालासोपाऱ्यात कळंब, राजोडी, वसई पश्चिम या परिसरातील बंगल्यात जाऊन, संस्थेला डोनेशनच्या नावाखाली अपंग मुला-मुलींकडून दारोदार भीक मागवून डोनेशन घेतलं जात होतं. दिवसाला हजार ते दीड हजार रुपये आणि सुट्टीच्या दिवशी तर 2000 हजार रुपये आणायचे अशी सक्तीच केली जात असल्याचे प्रिसीलाने तक्रारीत सांगितले आहे.  जर पैसे कमी आणले तर मॅनेजर अमन पांडे हा बेदम मारहाण करत होता.

परवा या पीडित मुलीने कमी पैसे आणल्यामुळे पांडे याने पीडित प्रिसीलाला हॉकीस्टिकने बेदम मारहाण केली. अपंग मुलीला मारहाण झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्या महिलांना कळल्यावर आज महिलांनी या संस्थेच्या कार्यालयात घुसून, मॅनेजरला बेदम मारहाण करून त्याला तुळींज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

याबाबत पीडित मुलीच्या तक्रारीवरून मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करून अमन पांडे याला पोलिसांनी अटक केले आहे. तर संस्थाचालक फंड कशासाठी गोळा करीत होता? अपंग मुलाची खरंच पिळवणूक होत होती का? याचा तपास आता तुळींज पोलीस करत आहेत.