मुंबईतील अनधिकृत झोपडपट्टीत आता अधिकृतपणे पाणी
एबीपी माझा वेब टीम | 17 Jun 2016 01:36 PM (IST)
मुंबई : मायानगरीतल्या सगळ्या अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये आता महापालिका अधिकृतपणे पाण्याचं कनेक्शन देणार आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत तसा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. 2000 सालानंतरच्या सगळ्या झोपड्यांना आता घरात पाण्याचा नळ मिळणार आहे. अर्थात भाजप आणि शिवसेनेनं बहुमतानं हा प्रस्ताव पारीत केला आहे. तर मनसेनं अनधिकृत झोपड्यांना पाणी देण्यास तीव्र विरोध केलाय. यामुळे परप्रातियांचे लोंढे वाढतील अशी भीती मनसेने व्यक्त केली. विशेष म्हणजे अनधिकृत झोपड्यांना पाणी देण्याच्या प्रस्तावात जाचक अटी आणि शर्थी असल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षानं तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. येत्या वर्षभरात मुंबई पालिकेच्या निवडणुका होतायत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय अतिशय महत्वाचा मानला जातोय. हायकोर्टाने मानवतेच्या भूमिकेतून सर्वांना पाणी मिळवण्याचा हक्क असल्याने अनधिकृत झोपड्यांना पाणी देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळं महापालिकेला हा निर्णय घ्यावा लागला. अनधिकृत झोपड्यांना आता मिळणार असले तरी यामधून ब-याचशा झोपड्यांना वगळण्यात आलंय फूटपाथ आणि रस्त्यावरील झोपड्या, खाजगी जमिनीवरील घोषित न केलेली झोपडपट्टी, समुद्र किना-यावर अस्तित्वात असलेल्या परंतु गावठाणमध्ये न येणा-या झोपड्या, सार्वजनिक वापरासाठीच्या जमिनीवरील झोपडया, प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणाच्या झोपड्यांना पाणी मिळणार नाही