उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक अवघ्या काही तासांवर आलेली असताना भाजपला मोठा धक्का बसला आहे. ज्या 'साई' पक्षाच्या जोरावर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे, त्या साई पक्षाची आपल्याकडे नोंदच नसल्याचं कोकण विभागीय आयुक्तांनी उल्हासनगर महापालिकेला लेखी स्वरुपात कळवलं आहे.


पाच एप्रिलला उल्हासनगरच्या महापौरपदाची निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीत साई पक्षाचे सदस्य मतदानाच्या प्रक्रियेतून बाद होण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा शिवसेनेला होणार असून भाजपचं महापौरपदाचं स्वप्न धुळीला मिळण्याची चिन्हं आहेत.

राज्यातील 10 महापालिका निवडणुकांपैकी उल्हासनगर ही महत्त्वाची महापालिका म्हणून ओळखली जाते. मागील 15 वर्षांपासून सातत्याने शिवसेनेच्या ताब्यात राहिलेल्या या महापालिकेत यंदा मात्र भाजप टीम ओमी कलानीच्या साथीने 32 जागा मिळवत क्रमांक एकचा पक्ष ठरला. मात्र अपक्षांच्या साथीनेही 39 ही मॅजिक फिगर भाजपला गाठता येत नसल्यानं त्यांनी 12 जागा निवडून आणणाऱ्या साई पक्षाला सोबत घेतलं.

उपमहापौरपद साई पक्षाला देण्याच्या बोलीवर भाजपने महापौरपदावर दावा केला. मात्र साई पक्षाने गटस्थापनेच्या केलेल्या दाव्यात पक्षाची घटनाच जोडलेली नसल्याचा आरोप 25 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला.

शिवसेनेच्या या पत्रानंतर कोकण आयुक्तांनी उल्हासनगर महापालिकेला एक पत्र पाठवलं असून यात कायदेशीर गटनोंदणी आणि अधिकृतरित्या महापालिका पक्ष म्हणून नोंदणी केलेल्या पक्षाच्या नगरसेवकांची यादीही जोडण्यात आली आहे. या पत्रात साई पक्षाची मात्र आपल्याकडे नोंदणी नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं असून त्यांच्या नोंदणी नसलेल्या 12 नगरसेवकांची स्वतंत्र यादी जोडण्यात आली आहे.

साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांनी मात्र आपला पक्ष अधिकृत असल्याचं सांगितलं आहे. कोकण आयुक्तांच्या या पत्रामुळे तूर्तास हे सर्व नगरसेवक अपक्ष ठरले आहेत. या सर्वच्या सर्व नगरसेवकांना महापौर निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारला जाऊ शकतो, किंवा पक्ष म्हणून नव्हे, तर अपक्ष म्हणून मतदान करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात.

यापैकी काहीही झालं, तरी फायदा मात्र शिवसेनेचाच होणार आहे. त्यामुळे आता बुधवारी पाच तारखेला होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत उल्हासनगर महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकतो, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.