विमान निर्मितीला जागा मिळताच वर्षात पहिलं उड्डाण : अमोल यादव
एबीपी माझा वेब टीम | 03 Apr 2017 04:27 PM (IST)
मुंबई : संपूर्ण भारतीय बनावटीचं पहिलं विमान बनवणारा डेप्युटी चीफ पायलट अमोल यादव यांची स्वप्नपूर्ती होणार आहे. विमान निर्मितीसाठी अमोल यांना राज्य सरकार पालघरमध्ये जागा देणार आहे. विमान कंपनीसाठी जागा हातात आल्यानंतर एक वर्षात पहिलं विमान (प्रोटोटाईप) उड्डाण करेल. एक वर्षाचा कालावधीही मला पुरेसा वाटतो, असं अमोल यादव म्हणाले. भारतीय बनावटीचं 19 सीटर विमान बनवण्याचा ध्यास अमोल यादव यांनी घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारनं त्यांना पालघरमध्ये 157 एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. MIDC च्या माध्यमातून अमोल यांना जमीन मिळणार आहे. वर्षभरानंतर मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला.