नवी मुंबई : रस्त्यावरील स्कूटी बाजूला घेण्यासाठी एनएमएमटी बसचालकाने हॉर्न वाजवल्यानं त्याचा राग मनात धरुन टोळक्यानं बसची तोडफोड केली. या टोळक्यानं बस चालकाला मारहाणही केल्याचा प्रकार उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. या प्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेची नवी मुंबई-कल्याण ही बस सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास नेवाळी मार्गे कल्याणला जात होती. भाल गावात भाल गुरुकुल समोर कल्याणकडे जाणाऱ्या रस्त्यावर बबलू म्हात्रे याने त्याची स्कुटी उभी केली होती. ही स्कूटी बाजूला घेण्यासाठी एनएमएमटी चालक अनंत जाधव यांनी बसचा हॉर्न वाजविला. याचा राग आल्यानं बबलू म्हात्रे आणि त्याच्या तीन साथीदारांनी अनंत जाधव यांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. तसंच या सरकारी बसचा कॅमेरा आणि समोरची काच तोडून बसचं नुकसान केलं. 


याप्रकरणी बसचालक अनंत जाधव यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी बबलू म्हात्रे आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, शासकीय वाहनाचं नुकसान आणि मारहाण करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. या तिघांनाही अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


पुण्यात बस चालक आणि तरुणात तुंबळ हाणामारी 


पुण्यातील पीएमपीएमएल बस चालक आणि दुचाकी चालकामध्ये सोमवारी रस्त्यावरच तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरुन पीएमपीएमएल चालक आणि दुचाकी चालकामध्ये हा वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. पुण्यातील पुणे स्टेशन परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात दुचाकी चालकाने पीएमपीएमएलच्या चालकाला चपलेने बेदम मारहाण केली आहे. त्यानंतर वाहकाने हा प्रकार पाहिला आणि वाहक देखील बसच्या खाली उतरला. त्याने देखील मारहाण करायला सुरुवात केली. त्या वाहकाला देखील दुसऱ्या तरुणाने मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी शेजारचे लोक त्या ठिकाणी बचावासाठी आले, मात्र दोघेही थांबायला तयार नसल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. 


महत्त्वाची बातमी :