कल्याण: मालमत्ताकराच्या थकबाकीची वसुली आता तृतीयपंथीयांमार्फत करण्याचा निर्णय उल्हासनगर महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी घेतलाय. सध्या महापालिकेच्या थकबाकीचा आकडा 360 कोटींच्या घरात गेला आहे. तेव्हा ही वसूल करण्यासाठी दिवाळीनंतर बॅण्डबाजा पथकासोबत तृतीयपंथी पालिका कर्मचार्‍यांना सहकार्य करणार आहेत.


पालिका आयुक्तांनी वसुलीचे अधिकार मुख्य लेखाधिकारी दादा पाटील यांना दिले असून, त्यांनी थकबाकी असलेल्या मालमत्तेची यादी बनवली आहे. तसेच थकबाकी भरण्यास नकार देणाऱ्यांना नोटिसा पाठवून आठ दिवसांत थकबाकी भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर, या थकबाकीदाराची मालमत्ता जप्त करुन लिलाव करण्यात येणार आहे.

यापूर्वी महापालिकेने 39 मालमत्ता जप्त केल्या असून त्याचाही लिलाव यावेळी करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, मालमत्ता थकबाकी वसुलीसाठी नगरसेविका रेखा ठाकूर यांनी आयुक्त निंबाळकर यांची भेट घेतली. तृतीयपंथीयांची वसुलीसाठी मदत घ्या, अशी संकल्पना मांडली. यासाठी आयुक्तांनीही मानधन देण्याची ग्वाही दिली.

यापूर्वी थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी विभागाने पथनाट्य, बँडबाजा, महिला बचत गट यांची मदत घेतली. पण तरीही थकबाकीचा आकडा कमी होत नसल्याने आता पालिकेने तृतीयपंथीयांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.