मुंबई : खेकड्याच्या दुर्मिळ प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी तेजस ठाकरे यांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंचे नातू, उद्धव यांचे पुत्र तेजस यांनी खेकड्याच्या प्रजाती 'गुबेरनॅटोरिआना ठाकरी' आणि इतर चार प्रजाती सावंतवाडीजवळ शोधल्या होत्या.

वन्य जीवाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार या प्रजातींचा अधिक अभ्यास करण्यासाठी तेजस ठाकरेंनी राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे, वन्यजीव संरक्षण मंडळासमोर तेजस यांनी संमती मागितली. काही अटी घालून सरकारने परवानगी दिली आहे.

राज्य सरकारच्या परवानगीनंतर ज्या खेकड्यांच्या प्रजाती दुर्मिळ झाल्या आहेत, त्यांचा अभ्यास तेजस करणार आहेत. खेकड्यांच्या प्रजाती, अन्नश्रुखला, ते दुर्मिळ का झाले यावर अभ्यास करणार आहेत.

तेजस यांनी लाल-जांभळट कवच आणि केशरी रंगाची नांगी असलेल्या काही खेकड्याच्या प्रजाती शोधल्या. सिंधुदुर्ग तालुक्यातील सावंतवाडीमध्ये गोड्या पाण्यात हे खेकडे आढळतात.

तेजस ठाकरेने शोधलेल्या खेकड्याच्या प्रजातीला ठाकरे कुटुंबाचं नाव


तेजस त्यावेळी कला शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकत होते. जंगल, झाडं आणि वन्य प्राण्यांचा अभ्यास करणं हा त्यांचा छंद आहे. गेल्या वर्षी ते सापाच्या दुर्मीळ प्रजातींचा शोध घेण्यासाठी कोकणात गेले होते. त्यावेळी रघुवीर घाटातील एका धबधब्यात गोड्या पाण्यातील खेकड्याच्या पाच प्रजातींचा शोध लागला.

गुबेरनॅटोरिआना ठाकरी, घातिमा अॅट्रोपर्पुरेआ, घातिआना स्प्लेन्डिडा, गुबेरनॅटोरिआना अल्कोकी आणि गुबेरनॅटोरिआना वाघी अशी या पाच प्रजातींची नावं ठेवण्यात आली आहेत.