उल्हासनगर : महावितरणच्या भोंगळ कारभाराचा नमुना उल्हासनगरात समोर आला आहे. कारण अवघ्या दीडशे स्क्वेअर फुटाच्या घरात राहणाऱ्या एका रहिवाशाला महावितरणने तब्बल दीड लाख रुपयांचं बिल पाठवलं आहे.
10 बाय 15 फुटांचं चाळीतलं घर, त्यात एक पंखा, टीव्ही आणि फ्रीज असं मोजकं सामान, पण विजेचं बिल मात्र 1 लाख 59 हजार रुपये.. हा प्रकार घडलाय उल्हासनगरजवळच्या वरप गावात राहणाऱ्या भागवत काकडे यांच्यासोबत. भागवत हे चालकाचं काम करतात. तुटपुंजा पगार, त्यात घर चालवण्याची तारेवरची कसरत करताना अचानक आलेल्या या विजेच्या बिलाने त्यांना मोठा शॉक बसला आहे. याबाबत महावितरणकडे मागच्या तीन महिन्यात त्यांनी अनेकदा चकरा मारल्या.. पण उपयोग शून्य..
भागवत काकडे यांच्याप्रमाणेच या परिसरात अनेकांना अशाप्रकारे वाढीव वीजबिलं आली आहेत. कुणाला 10 हजार, कुणाला 15 हजार, तर कुणाला थेट 20 हजार. या परिसरात राहणारे बहुतांशी लोक हे रिक्षा, टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करणारे आहेत. दिवसभर राबायचं आणि त्यावर उदरनिर्वाह करायचा, असा त्यांचा दिनक्रम.. मात्र त्यात वीज बिलाचे आकडे पाहून हे लोक पुरतर हादरले आहेत.
या सगळ्याबाबत स्थानिकांनी वारंवार महावितरणकडे तक्रारी करुनही अद्याप काहीही फरक पडलेला नाही. उद्या काहीतरी केल्यासारखं दाखवण्यासाठी महावितरण त्यांची मीटर बदलून देईल, मात्र त्यांना आलेल्या या बिलांचं काय? हा प्रश्न मात्र कायम आहे.