मुंबई: 2019 च्या निवडणुकांआधी राज्यातल्या राजकीय घडीमोडींना वेग वाढला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि भारिप बहुजन संघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात आज बैठक झाली. राजू शेट्टी हे आंबेडकर-ओवेसींच्या नव्या बहुजन वंचित विकास आघाडीत सहभागी होणार का?, याचं उत्तर काही दिवसात मिळणार आहे.


"भाजपविरोधात सर्वांनी एकत्र यावं, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं. तिसऱ्या आघाडीपेक्षा महाआघाडी महत्वाची आहे. तिसरी आघाडी करण्यापेक्षा सर्वांना एकत्र घेत महाआघाडी करु", असा प्रस्ताव राजू शेट्टींनी प्रकाश आंबेडकर यांना दिला.

मुंबईतील राजगृह इथे खासदार राजू शेट्टी आणि भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठकीस झाली. यावेळी आमदार कपिल पाटील आणि 'स्वाभिमानी'चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते.

भारिप आणि एमआयएमने बहुजन वंचित विकास आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीची पहिली जाहीर सभा 2 ऑक्टोबरला औरंगाबादेत पार पडली. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वाभिमानीला जागा देण्यास राष्ट्रवादी तयार

एकीकडे राजू शेट्टी-प्रकाश आंबेडकर यांची भेट होत असताना, तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचीही बैठक सुरु आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे 25 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यातील एक जागा स्वाभिमानीला सोडण्यास तयार असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.

त्यामुळे शेट्टी-आंबेडकरांच्या बैठकीनंतर काय ठरणार, राजू शेट्टी आंबेडकर-ओवेसींसोबत जाणार की पवारांची साथ देणार, याकडे राजकीय वर्तुळासह शेतकरी वर्गाचंही लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या 

तटकरेंची माघार, रायगडमधून भास्कर जाधव जवळपास निश्चित  

पार्थच्या उमेदवारीवर पवार अनुकूल नाहीत, अजित पवारांचं सूचक मौन   

निवडणूक लढवणार की नाही? शरद पवारांचं उत्तर  

मुस्लिम-बहुजनांनो, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक व्हा : ओवेसी