कल्याण : केडीएमसीने प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जागेवर स्वतःच परस्पर इमारत उभारल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला होता. आता ही इमारत पाडून प्रकल्पग्रस्तांना जागा मोकळी करुन देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे कल्याणच्या 72 वर्षीय आज्जीबाईंना अखेर एक तपानंतर न्याय मिळाला आहे.

कल्याणच्या गोविंदवाडी भागात राहणाऱ्या या आहेत अजमत आरा.. 72 वर्षांच्या अजमत आरा या लखनऊच्या नवाब घराण्याच्या वंशज आहेत. लग्न होऊन कल्याणमध्ये आल्यानंतर त्यांनी गोविंदवाडी भागात चार दुकानं घेतली. मात्र या भागातून गोविंदवाडी बायपास गेल्याने केडीएमसीने त्यांची जागा अधिग्रहित केली. या मोबदल्यात त्यांना कल्याणच्या कचोरे गावात एक भूखंड देण्यात आला. मात्र काही काळानंतर केडीएमसीने आरा यांची कुठलीही परवानगी न घेता बीएसयूपी प्रकल्पाची सात मजली इमारत या जागेवर उभारली.

या प्रकारानंतर आरा यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. तिथे तब्बल 12 वर्ष हा खटला चालला, आणि अखेर निकाल अजमत आरा यांच्या बाजूने लागला. त्यामुळे सध्या त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. स्वतः अजमत आरा आणि त्यांची मुलं, नातवंडं यांनी या निकालानंतर आनंद साजरा केला.

ज्या बीएसयूपी प्रकल्पात केडीएमसीने आरा यांच्या जागेवर इमारत उभारली होती, ती इमारत आता केडीएमसीला पाडावी लागणार आहे. या इमारतीतली घरं सुदैवाने अद्याप कुणाला देण्यात आलेली नसली, तरी यामुळे केडीएमसीला त्यांच्याच भोंगळ कारभारामुळे मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. या सगळ्याबाबत केडीएमसीची भूमिका मात्र गुलदस्त्यातच आहे.