उल्हासनगरमधील धुरु बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सर्रासपणे डान्सबार चालतो. महत्वाचं म्हणजे गेल्याच शुक्रवारी इथं धाड पडली. मात्र बारमधल्याच तीन गुप्त ठिकाणांमध्ये धाडीवेळी बारबाला लपून बसल्या आणि पोलिसांची पाठ फिरताच पुन्हा छमछम सुरु झाली.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे बार कुणाच्या आशीर्वादानं सुरु आहेत. यासंबंधीच एक रेटकार्ड सध्या उल्हासनगरात चर्चेचा विषय ठरलं आहे. ज्यात पोलीस अधिकाऱ्यांपासून पत्रकारांपर्यंत कसा मलिदा पोहोचवला जातो आणि त्यांच्या मेहेरबानीनं कसे बार सुरु राहतात, याची पूर्ण माहिती आहे.
व्हायरल झालेलं रेटकार्ड
बारचं रोजचं उत्पन्न- 8 लाख रुपये
स्थानिक पोलीस उपायुक्त- महिन्याला 1 लाख
स्थानिक सहाय्यक पोलीस आयुक्त- महिन्याला 50 हजार
नाईट राऊंडसाठी रोज 1 हजार, गाडी चालक आणि वॉकीटॉकी चालकाला 200 रुपये
नाईट ऑफिसर- एक ब्लॅक डॉग व्हिस्की, चिकन मंचुरिअन, फ्राईड राईस आणि मिनरल वॉटर
शहरातले बडे पत्रकार- महिन्याला 10 हजार
महत्वाचं म्हणजे या मलिद्यापायी दोन कॉन्स्टेबल चक्क ग्राहकांची भांडणं सोडवण्यासाठी कायम बारमध्ये असतात अशीही माहिती आहे. सुरु असलेले बार आणि व्हायरल झालेलं रेटकार्ड याबाबत आम्ही पोलिसांनी गाठलं, मात्र ते कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार देत आहेत. मात्र उल्हासनगरमधील हे बार वरदहस्तानंच सुरु आहेत, याबाबत शंका नाही.