मुंबई :  शिवसेना पुन्हा एकदा अयोध्या मुद्द्यावरुन आग्रही होताना दिसत आहे. निवडणुकीआधी केलेल्या अयोध्या दौऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवनिर्वाचित खासदारांसह पुन्हा अयोध्यावारी करणार आहेत. अयोध्येत जाऊन 15 जूनला शनिवारी शिवसेनेचे खासदार रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत.


लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर नवनिर्वाचित शिवसेना खासदारांनी एकवीरा देवीचे दर्शन घेतलं. कोल्हापूरमध्ये जाऊन अंबाबाईचे दर्शनही घेत आशीर्वाद घेतले. यानंतर आता शिवसेनेने आपला मोर्चा अयोध्येकडे वळवला आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 15 जूनला अयोध्येत जाऊन शिवसेनेच्या सर्व विजयी खासदारांसह रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत.



दरम्यान पुन्हा एकदा राम मंदिर प्रश्न धसास लावण्यासाठी शंख फुंकणार असल्याचं शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब रामलल्लाचं दर्शन घेतलं

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबरमध्ये सहकुटुंब रामलल्लाचं दर्शन घेतलं होतं. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे हे यावेळी उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंच्या मार्गावर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी शरयू नदीच्या किनाऱ्यावर महाआरती केली होती. शरयू नदीच्या तिरावर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी राम मंदिराच्या निर्मितीसाठी जर अध्यादेश आणला तर शिवसेना सरकारला पाठिंबा देईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.