मुंबई : मुंबईत शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटिनच्या पाच कांड्या सापडल्यानं खळबळ उडाली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कारशेडमध्ये उभ्या एक्स्प्रेसमध्ये सफाई सुरु असताना या कांड्या सापडल्या आहेत. बॉम्बशोधक पथकाकडून स्फोटकाला पुष्टी मिळाली असून ही स्फोटके निकामी करण्यात आली आहेत. त्यासोबत भाजप सरकारविरोधात काही पत्रही मिळालं आहे.
घटनेनंतर आरपीएफ, जीआरपीएफची, बॉम्बशोधक पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण स्टेशन परिसर रिकामा करण्यात आला होता.
बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास शालिमार एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस कारशेडमध्ये दाखल झाली होती. त्यानंतर सफाईदरम्यान कर्मचाऱ्यांना काही संशयास्पद वस्तू एका डब्यात आढळल्या. सफाई कर्मचाऱ्यांनी तात्काळ सुरक्षा यंत्रणेला याबाबत माहिती दिली.
त्यानंतर सुरक्षा यंत्रणेने तपासणी केली असता त्यांना याठिकाणी पाच जिलेटीनच्या कांड्या, फटाके आणि बॅटरीज् असं संशयास्पद सामान आढळलं. या वस्तू ट्रेनमध्ये कशा आल्या? याद्वारे घातपाताच डाव होता? असे प्रश्न आता सुरक्षा यंत्रणेपुढे निर्माण झाले आहेत. त्याचा तपास सध्या सुरक्षा यंत्रणेकडून केला जात आहे.
भाजप सरकारविरोधी पत्रही आढळलं
याठिकाणी एक पत्रही आढळलं आहे. पत्रातील मजकुरानुसार, चार जणांचा यामध्ये समावेश आहे. "भाजप सरकारला आपल्याला दाखवायचं आहे की आपण काय आहोत आणि आपण काय करु शकतो. आमचा पंजा पडल्यावर काय होतं हे आपल्याला दाखवायचं आहे", अशा आशयाचं हे पत्र आहे.
शालिमार एक्स्प्रेस कोलकात्याहून मुंबईत दाखल झाली होती. त्यामुळे या एक्स्प्रेसच्या मार्गावरील कोलकात्यापासून मुंबईपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही तपासले जात आहे.