पोलिसांच्या सुरक्षेसंदर्भात उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
एबीपी माझा वेब टीम | 07 Sep 2016 04:57 AM (IST)
मुंबई : मुंबई पोलिसांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीत उद्धव ठाकरे पोलिसांच्या सुरक्षेसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. वाहतूक पोलिस विलास शिंदे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी काय करता येईल याबाबत पोलिसांच्या कुटुंबीयांनी नुकतीच 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी पोलिस कुटुंबीयांनी अनेक मागण्या उद्धव ठाकरेंपुढे मांडल्या होत्या. त्याच संदर्भात पोलिसांच्या कुटुंबीयांसह उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या समस्या मांडणार आहेत. पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कारण वाहतूक पोलिस विलास शिंदे यांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच, विले पार्लेमध्ये महिला वाहतूक पोलिसाला मारहाण झाली. तर कल्याणमध्ये गणपती विसर्जनादरम्यान पोलिस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय जालन्यात भाजप आमदाराच्या धमक्यांनी कंटाळलेल्या पोलिस निरीक्षकाने कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.