मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येत समान दुवा सापडला असून त्यादृष्टीनं येत्या 14 दिवसांत एक मोठं ऑपरेशन करण्यात येणार आहे. अशी माहिती सरकारी वकिलांनी शुक्रवारी हायकोर्टात दिली.


तसेच डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात नव्यानं अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी खाडीत फेकलेलं हत्यार शोधून काढण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाकडून परवानग्या मिळाल्या असून लवकरच या कामाला सुरूवात होईल असं सीबीआयकडून कोर्टाला सांगण्यात आलंय.

मात्र पानसरे हत्याप्रकरणांत मुख्य सुत्रधार तर दूरच पण अजून मारेकऱ्यांचाही शोध न लागल्याबद्दल कोर्टानं नाराजी व्यक्त केली. तसेच धर्मनिरपेक्ष आणि समानतेच्या घोषणा करणाऱ्या सरकारनं आणि राजकीय पुढाऱ्यांनी तपासयंत्रणेच्या कामात ढवळाढवळ करू नये असे निर्देश दिले आहेत.
तसेच गेल्या सुनावणीत हायकोर्टानं राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेल्या निर्देशांमुळे गृह आणि अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांनी याबाबत बैठक घेतली आहे. जेणेकरून या दोन्ही तपासांत सीबीआय आणि एसआयटीला सर्वतोपरी सहाय्याची तयारी करता येईल. यासंदर्भातील सुनावणी हायकोर्टानं चार आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.



कोल्हापूर येथे फेब्रुवारी 2015 साली कॉम्रेड गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती तर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचाही अज्ञात मारेकऱ्यांनी ऑगस्ट 2013 साली हत्या केला होता. या प्रकरणी दोन्ही कुटुंबियांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.



संबंधित बातम्या


हायकोर्टाने दाभोलकर, पानसरे कुटुंबीयांना सुनावलं