उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात होण्याआधी रत्नागिरीत अपघाती मृत्यू झालेल्या सात शिवसैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बॅनरवर आशीर्वाद देणाऱ्या हातांएेवजी आता गळा दाबणारे
मुंबईभरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात 26 जानेवारीनंतर भगवं चैतन्य पसरलं आहे. युती तोडली आणि सुटलो असं वाटलं. उल्हासनगरमध्ये भाजपचं बॅनर पाहून सुटलो असं वाटलं. युती तोडली नसती तर कलानी, मोदी आणि शाह यांच्यासोबत माझाही फोटो लागला असता. युती का तोडली? परिवर्तन तर होणारच, असे सगळीकडे पोस्टर पाहतोय. आधी भाजपच्या मंचावर अाडवाणी, वाजपेयी, सुषमा स्वराज दिसायच्या. पण आशीर्वाद देणाऱ्या हातांएेवजी आता गळा दाबणारे दिसायला लागले. भाजप सत्तेसाठी कुणाशीही हातमिळवणी करते, असा बोचरा वार उद्धव ठाकरेंनी केला.
मनमोहन सिंह यांच्यावरील टीकेचा खरपूस समाचार
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर केलेल्या टीकेचा, उद्धव ठाकरेंनी सभेत खरपूस समाचार घेतला. मोदी म्हणाले मनमोहन सिंह रेनकोट घालून आंघोळ करतात पण तुम्ही बिनपाण्याची सगळ्या देशाला आंघोळ घालत आहात. ते साबणाच्या पाण्याचे बुडबुडे सोडत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
समोरसमोर होऊन जाऊ दे
मुंबई महापालिकेतील कामांविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मुंबईकरांना मान खाली घालायला लावेल असं एकही काम शिवसेनेने केलेलं नाही. शिवसेनेच्य़ा जाहीरनाम्यात महापालिकेतील कामांचा उल्लेख केला आहे. भाजपला आव्हान देतो, तुम्ही मुंबईसाठी केलेली काम घेऊन समोर या, आम्ही पण येतो, होऊन जाऊ द्या एकदा काय ते समोरासमोर."
"भाजपने आमच्या वचननाम्यात बाळासाहेबांच्या स्मारकाचा उल्लेख नाही, हे खसपट काढलं. पण राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय महापालिकेच्या वचननाम्यात मी का टाकू?," असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
प्रचारापुरता शिवरायांचा पुतळा वापरत नाही
आमच्यावर शिवरायांच्या नावाने खंडणी मागण्याचे आरोप करता आणि स्वत: पप्पू कलानीसोबत फिरता. शिवरायांच्या नावाने आम्ही खंडणी मागत नाही, शिवराय आमचे दैवत आहे. तुमच्यासारखे प्रचारापुरता शिवरायांचा फोटो नाही वापरत. तुम्ही कधी शिवजयंती तरी साजरी केली आहे का?, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
भविष्यात दाऊदही भाजपात दिसेल
गुंडांच्या इनकमिंगवर बोलताना उद्धव यांनी भाजपला टोला लगावला. दाऊदला फरफटत आणणार म्हणायचे, पण हे त्यांना जमायचं नाही. एक दिवशी बातमी येईल, दाऊद वार्धक्याने थकून वाट पाहून मेला. नाहीतर दाऊद भाजपात प्रवेश करुन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग म्हणतील 'देश का नेता कैसा हो दाऊदाचार्य जैसा हो'
पाहा संपूर्ण भाषण