मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या कामकाजात व्यस्त असल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेट न घेताच परतले. नियोजित बैठकीला मुख्यमंत्र्यांकडून उशीर झाल्यामुळे उद्धव ठाकरेंना तासभर प्रतीक्षा करुन परतावं लागलं.


उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बुधवारी संध्याकाळी बैठक नियोजित करण्यात आली होती. शिवसेना आमदारांच्या निधीसंदर्भात काही विषय मांडण्यासाठी 'शिवालय' या शिवसेनेच्या कार्यालयात ही भेट होणार होती. त्यासाठी संध्याकाळी पाच वाजल्यापासून उद्धव ठाकरे वाट पाहत बसले होते. मात्र सभागृहाच्या कामकाजात व्यस्त असल्यामुळे फडणवीस ठरल्या वेळी येऊ शकले नाहीत. अखेर उद्धव ठाकरे भेट न घेताच निघून गेले.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये फोनवरुन संभाषण झाल्याची माहिती शिवसेनेच्या सुत्रांनी दिली. भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी पुढची वेळही ठरवून दिली. त्याचप्रमाणे नियोजित बैठकीला वेळ देता न आल्याबद्दल फडणवीसांनी दिलगिरीही व्यक्त केली.

एकीकडे भाजपकडून शिवसेनेला युतीसाठी हात पुढे करण्याची तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना ताटकळत ठेवल्याने विधीमंडळात विरोधकांमध्ये कुजबूज सुरु आहे. मित्रपक्षाचे प्रमुख भेटीला आल्यामुळे राखीव वेळेत फडणवीसांनी पोहचायला हवं होतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दुसरीकडे, भाजपकडून राज्यसभेवर गेलेले नारायण राणे विधानसभा अध्यक्षांच्या दालनात उपस्थित असल्याची माहिती आहे. त्यामुळे राणेंमुळे ही पूर्वनियोजित भेट पुढे ढकलल्याची चर्चा आहे.