मुंबई : राज्य सरकारवर उंदीर घोटाळा केल्याचा आरोप ताजा असतानाच एका नवीन घोटाळ्याने तोंड वर काढलं आहे. हे वादळ चहाचं असलं, तरी चहाच्या पेल्यात शमणारं नाही! मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयात 2015-2016, 2016-2017 आणि 2017-2018 मध्ये चहा आणि अल्पोपहारावर केलेला खर्च हा दरवर्षी दुपटीहून अधिक झाल्याकडे संजय निरुपम यांनी लक्ष वेधलं.

माहितीच्या अधिकारा अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार 2015-2016 साली सीएमओमध्ये चहा आणि अल्पोपहारावर 57 लाख 99 हजार 156 रुपये खर्च झाला होता. तो खर्च 2016-2017 मध्ये एक कोटी 20 लाख 92 हजार 972 रुपयांवर पोहचला.

त्यानंतर 2017-2018 वर्षात तर चहा आणि अल्पोपहारावर तीन कोटी 34 लाख 64 हजार 905 रुपये खर्च झाला. म्हणजे गेली तीन वर्षे प्रत्येक वर्षी चहा आणि अल्पोपहारावर खर्च वाढत गेल्याचं निरुपम म्हणाले.

उंदीर घोटाळ्याची जळमटं सोडवता-सोडवता राज्य सरकारच्या नाकी नऊ आलेले असताना नव्या घोटाळ्याच्या आरोपांना भाजप सरकार कसं आणि काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :


उंदीर घोटाळ्यावरुन विखे पाटलांची चौफेर टोलेबाजी


मंत्रालय नव्हे उंदरालय, शिवसेनेचं टीकास्त्र


उंदीर घोटाळा : कंत्राट दिलेली सहकारी मजूर संस्थाच अस्तित्त्वात नाही?


मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा, खडसेंचा नवा आरोप