Shiv Sena Chief Uddhav Thackrey :  शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनातून संवाद साधला. यावेळी त्यांनी नव्या सरकारचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी आरे कारशेड, नव्या सरकारची स्थापना अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या पाठीत वार करा पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. आरेच्या निर्णयावरुन मला दु:ख झाले असल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका असेही ते म्हणाले. गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला असता तर हे झालचं नसते असेही ठाकरे म्हणाले. 


उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे



  1. माझ्या पाठीत वार करा, पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका, आरेच्या निर्णयाचं दु:ख झालं, त्यामुळं माझा चेहरा आज उतरलेला दिसत असेल

  2. मुंबईकरांच्या वतीनं हात जोडून विनंती, आरेचा आग्रह नको, कांजूरमार्गचा निर्णय कायम राहू द्या

  3. हे सरकार माझ्याबरोबत अमित शाह यांनी ठरवलेलं सरकार, हा शब्द त्याच वेळी पाळला असता तर महाविकास आघाडी जन्माला आली नसती.

  4. जे आज केलं, ते अडीच वर्षांपूर्वी का नाही केलं? 

  5. मला दिलेला शब्द पाळला असता तर निदान अडीच वर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री राहिला असता, पण आता भाजपचा मुख्यमंत्रीही झाला नाही

  6. सत्ता येते सत्ता जाते पण तुमच्यासारखं प्रेम क्वचितच कुणाला लाभतं, ते मला लाभलं...

  7. शिवसेनेशिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, सध्या असलेला तथाकथित मुख्यमंत्री हा शिवसैनिक नाही.

  8. लोकशाहीचे धिंडवडे थांबवण्याची गरज आहे. लोकशाही वाचवा, चारही स्तंभ एकत्र या

  9. ज्यांनी मतदान केलं, त्यांच्याशी प्रतारणा करु नका; मतदारांचा लोकशाही वरचा विश्वास उडेल

  10. मी महाराष्ट्राच्या जनतेचा आभारी आहे. जे अश्रू तुमच्या डोळ्यात आहेत, त्याच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही, तुमचे अश्रू माझी ताकत आहे.