Maharashtra DCM Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची महाराष्ट्रातील राजकीय उलटफेरीत (Maharashtra) 'चाणक्य' अशी प्रतिमा निर्माण झाली. मात्र भाजप (BJP) हायकमानकडून ऐनवेळी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यांनी शपथ देखील घेतली. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर नेते (Rebel Leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शपथ घेतली. शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड होणं ही जितकी आश्चर्याची गोष्ट होती तितकीच आश्चर्याची गोष्ट होती उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेणं...


राज्यात 10 दिवस चाललेलं राजकीय बंड, त्यानंतर आलेले ट्विस्ट या सगळ्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी शपथ घेतली. त्यानंतर बैठक घेत कामाला सुरुवातही केली. मात्र असं असलं तरी कालपासून चर्चा रंगतेय ती फडणवीसांच्या नाराजीची आणि भाजपच्या अंतर्गत वादांची. काल मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करताना आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही असं फडणवीसांनी जाहीर केलं. मात्र त्यानंतर केंद्रातून सूत्र हलली आणि फडणवीसांना थेट पक्षश्रेष्ठींचे फोन गेले. एवढंच नव्हे तर भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी तर माध्यमासमोर येऊनच फडणवीसांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याबद्दल भाष्य केलं आणि त्यानंतर राजभवनात देवेंद्र फडणवीस शपथविधीला दिसले आणि अखेरीस त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र या सगळ्या राजकीय ट्विस्ट्समध्ये फडणवीसांच्या नाराजीची चर्चा चांगलील रंगली. शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून देखील ते नाराज असल्याचं स्पष्ट दिसत होतं. शरद पवार यांनी देखील यावर भाष्य केलं.  




काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर पदनामाचा उल्लेख केलेला नाही. त्यांच्या ट्वीटर प्रोफाईलला महाराष्ट्र सेवक एवढाच उल्लेख कायम आहे. एवढंच नव्हे तर आज त्यांच्या सोशल मीडियावरुन काही पोस्ट केल्या आहेत. यातील पोस्टर्सवर केवळ 'देवेंद्र फडणवीस' एवढाच उल्लेख आहे. त्यावर कुठेही उपमुख्यमंत्रीपदाचा उल्लेख केलेला नाही.  






चर्चा अशी होती की, भाजप-शिंदे गटाचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. मात्र स्वत: फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली. मात्र शपथविधीच्या काही वेळ आधीच भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पक्षाच्या आदेशानुसार आपण ही शपथ घेतली असल्याचं ट्वीट देखील फडणवीसांनी केलं. 
 
चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनण्याचं सांगितलं आणि पक्षाचं फर्मान शिरोधार्य असल्याचं म्हणत त्यांनी शपथ घेतली. शपथविधीच्या या कार्यक्रमात आणि नंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीचे फोटो बघितले तर त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर कुठेही आनंद दिसत नव्हता. ते नाराज असल्याचं स्पष्ट दिसत होतं, अशी चर्चाही आहे.  एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे, असं त्यांनी ट्वीट करत म्हटलं.


या गोष्टींची अधिक चर्चा 
 
चर्चा अशी सुरु आहे की, भाजपचा हा निर्णय फडणवीसांचं खच्चीकरण करणारा आहे. फडणवीस यांनी मीडियासमोर सांगितलं की ते सरकारमध्ये राहणार नाहीत आणि कॅबिनेटचा भाग नसतील. त्यानंतर केंद्रानं फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचं सांगत ते (फडणवीस) चुकीचं असल्याचं दाखवून दिलं. 


केंद्रीय नेतृत्व आणि फडणवीस यांच्यात सुसंवाद नाही का? अशीही चर्चा सुरु झाली आहे. एकीकडे फडणवीस सत्तेत सहभागी न होण्याचं सांगतात आणि केंद्रीय नेतृत्वाला याबाबत माहितीही नसते. 


एकनाथ शिंदेंना सरकार चालवण्याचा अनुभव नाही, त्यामुळं बंडखोरांना एकजुटीनं ठेवणं आव्हानात्मक असेल. यामुळं भाजपनं फडणवीसांनी सरकारचा भाग बनायला सांगितलं, अशीही चर्चा आहे. 


2024 च्या निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळं प्रशासनात प्रभाव राहावा यामुळं फडणवीसांना सत्तेत राहण्यास सांगण्यात आलं असावं. 


फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्यानं भाजप नेते आणि कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता होती, त्यामुळं स्वत: पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील, अशी घोषणा केली.