पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये दिवसेंदिवस रंगतदार वळणं येत आहे. पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पालघरमधल्या कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचा दावा खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

पालघरमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या भरसभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप जगजाहीर केली. हे संभाषण मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे.

या ऑडिओ क्लिपची निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी या सभेमध्ये केली.

काय आहे ही फडणवीसांची कथित ऑडिओ क्लिप?

एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता... आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे?
ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही
आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे
ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा...
साम, दाम, दंड, भेद...
ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही.
कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे.
'अरे ला कारे'च करायचं..
'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे


दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड झाल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी केली आहे. भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.

पराभव समोर दिसू लागल्यामुळे सैरभैर झालेल्या शिवसेनेकडून अर्धवट आणि एडिट केलेली आॅडिओ क्लिप दाखवली जात आहे. या संदर्भात उद्या निवडणूक आयोगाकडे भाजप तक्रार करणार आहेच, पण त्याबरोबर खरी क्लिपही उद्या जाहीर करणार, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे.

पाहा व्हिडिओ :


संबंधित बातम्या :


पालघर : शिवसैनिकांनी पैसे वाटणाऱ्याला पकडलं, भाजपवर आरोप

होय आम्ही कुत्रे आहोत : हितेंद्र ठाकूर

हितेंद्र ठाकूरांनी उद्धव ठाकरेंच्या कानात काय सांगितलं?