मुंबई: 'आपण अजून कुंपणावर आहोत, इकडे का तिकडे ठरलेलं नाही. त्यामुळे जरा दोन दिवस शांत राहा. 26 तारखेला मी सविस्तर बोलणार आहे.' शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्यापही युतीबाबत चर्चा सुरु असल्याचं म्हटलं. आज शिवसेनेच्या पुस्तकाच्या ऑडिओ बुकचं मुंबईत अनावरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.


'ज्यांचा माझ्यावर, शिवसेनेवर विश्वास नसेल त्यांनी बेधडक पुढे निघून जावं. त्यांनी माझ्यासोबत राहू नये. जे निष्ठावंत आहेत ते माझ्यासोबत राहतील.' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, 'आपण आज काहीही राजकारणावर बोलणार नाही. कारण की, त्यामुळे दोन दिवस शांत राहा. त्यानंतर मी 26 तारखेला सविस्तर बोलणार आहे. आज आपण निर्णायक टप्प्यावर आहोत, पण तुम्ही सोबत आहात तर चिंता नाही.' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

'मोदींच्या जाहिरातींपेक्षा वचननामा पूर्ण करण्यासाठी कमी खर्च'

'आज मी वचननामा जाहीर केला, त्यावेळी मला कुणी तरी विचारलं की, या सगळ्याला नेमका खर्च किती? त्यावेळी मी त्यांना म्हटलं की, पंतप्रधानांच्या जाहिरातीवर जेवढा खर्च होतो त्यापेक्षा कमीच!, जाहिरातीत स्वतःचे चेहरे काय दाखवायचे?' अशी पंतप्रधान मोदींवर टीका करता उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचलं.

'जलीकट्टूसाठी लोकांनी केंद्र सरकारलाही झुकवलं'

'जलीकट्टूसाठी तामिळनाडूमधील लोकांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन केंद्र सरकारला झुकवलं. याला म्हणतात एकजूट. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी तामिळनाडूमधील जलीकट्टूच्या आंदोलनाकडेही लक्ष वेधलं.'