मुंबई: शिवसेनेने जाहीरनामा ‘रिपीट करून दाखवला’, अशा शब्दात काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली.
'जे बोलतो ते करुन दाखवतो', या टॅगलाईनखाली शिवसेनेने आज आपला वचननामा जाहीर केला. त्यावरुन विखे पाटील यांनी निशाणा साधला.
शिवसेनेने मागील मनपा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे पुन्हा यंदाच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केले आहेत. त्यामुळे शिवसेनेने ‘रिपिट करून दाखवलं’, अशी उपरोधिक टीका विखे पाटील यांनी केली.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेने ‘करून दाखवलं’ अशी दर्पोक्ती केली होती. तसे असेल तर मग जुन्या जाहीरनाम्यातील अनेक मुद्दे यंदाही पुन्हा जाहीर केल्याबद्दल शिवसेनेने ‘रिपिट करून दाखवलं’ असंच म्हणावे लागेल, असं विखे म्हणाले.
विरोधी पक्षात असताना शिवसेनेने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार कोटींचं पॅकेज देण्याची मागणी केली होती. खड्डेमुक्त मुंबई करण्याचे स्वप्न दाखवले होते. परंतु, सत्तेत आल्यानंतर यातील एकही आश्वासन शिवसेनेला पूर्ण करता आले नाही. त्यासाठी त्यांना शेतकरीद्रोही, जनताद्रोही नाही तर आणखी काय म्हणायचं? अशीही विचारणा विखे पाटील यांनी केली.