मुंबई : मुंबईतील मस्जिद बंदर स्टेशनजवळ झोपडपट्टीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मध्य रेल्वेवरील मस्जिद स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकबाहेर असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आणि 8 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
आगीमुळे अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील फास्ट लोकलची वाहतूक काही काळ खोळंबली होती. आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतरही जलद मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.
झोपडपट्टीला लागलेल्या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीत चार ते पाच लहान मुलं जखमी झाली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रेल्वे ट्रॅकला लागूनच झोपडपट्टी असल्यामुळे फास्ट लोकलची वाहतूक खबरदारी म्हणून बंद करण्यात आली होती. ऐन गर्दीच्या वेळी लोकलची वाहतूक रखडल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.
सीएसटी आणि मश्जिद या दोन्ही स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली. काही फास्ट लोकल स्लो मार्गावरुन काढल्या मात्र मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर मोठी गर्दी होती.
https://twitter.com/kunwarmritunjay/status/823540590096695297