मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. शिवतीर्थावर मोठ्या थाटामाटात झालेल्या शपथविधी सोहळ्यात ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बरोबर 6.40 वाजता उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना मोदी यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा. मला खात्री आहे की ते उज्वल महाराष्ट्रासाठी ताकतीने काम करतील.


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे की, शिवसेनेचे कार्याध्यक्ष श्री उद्धव ठाकरेजी यांनी मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली. त्याप्रसंगी उपस्थित होतो.त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!

'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे'.. छत्रपती शिवराय आणि माता-पित्यांना वंदन करुन शपथ घेतो की..


भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा देताना म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील कल्याणकारी शासन #शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला दिले.  उद्धव ठाकरे यांनी देखील आता जनतेच्या हिताचे सरकार अस्तित्वात आणावे, ही अपेक्षा आणि त्यासाठीच शुभेच्छा!

हे ही वाचा - 'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे'... लेखक, कवी, उत्तम फोटोग्राफर ते मुख्यमंत्री, भन्नाट जीवनप्रवास
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा देताना म्हटलं आहे की, आदरणीय व प्रिय उद्धवजी यांना मनःस्वी शुभकामना!! एका ठाकरेनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले..हार्दिक अभिनंदन!! महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे 'राज्याचे हित प्रथम '!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!'


शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांचंं हार्दिक अभिनंदन! त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा सर्वांगीण विकास होईल, असा मला विश्वास आहे. त्यांना पुढच्या यशस्वी राजकीय प्रवासासाठी मनस्वी शुभेच्छा, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे की, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबाबत त्यांचे हार्दिक अभिनंदन! महाराष्ट्र विकास आघाडी सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे स्थिर सरकार स्थापन करणार आहेत.