मुंबई : शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकादारांना कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या शपथविधीमध्ये काय बेकायदेशीर आहे? असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला. 'कायदेशीर विवाहांमध्ये घटस्फोट होण्याची पद्धत नवी आहे का?' असा उपरोधिक टोला मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने लगावला. त्यानंतर या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी वकिलांनी आणखी एका खंडपीठापुढे प्रयत्न केला. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठानेही यावर सुनावणीला स्पष्ट नकार दिला.


विधानसभा निवडणुकांनंतर राज्यामध्ये सत्तासंघर्षाचा मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकासआघाडी तयार करुन राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. याच पार्श्‍वभूमीवर आज मुख्यमंत्री म्हणून स्वत: उद्धव ठाकरे शपथ ग्रहण करणार आहेत. मात्र निवडणुकीआधी भाजप आणि शिवसेनेने युती करुन मतदारांना मत देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मतदारांनी त्यांना सर्वाधिक मताधिक्‍यांनी निवडूनही दिले आहे. मात्र आता भाजपशी वेगळे होऊन शिवसेनेनं विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीशी सूत जुळवत मुख्यमंत्रीपद स्वत:च्या पदरात पाडून घेतलं.


मात्र अशाप्रकारे मतदारांचा विश्‍वासघात करुन असं करता येऊ शकत नाही, त्यामुळे शिवसेना आणि भाजपनेच पुन्हा एकत्र यावे, अशी मागणी एका याचिकेद्वारे यापूर्वीच केली गेली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी व्हावी यासाठी याचिकादार वकिल मॅथ्यू नेदुमपारा यांनी मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे केला. मात्र यावर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टानं नकार दिला. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसला 54 तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत.



औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल


औरंगाबादमधील पेशाने वकील असलेल्या रत्नाकर चौरे या व्यक्तीने शिवसेना नेते उद्धव ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात पोलिसांत काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असली तरी याबाबत कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेच्या प्रत्येक भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा असायचा. औरंगाबादच्या प्रचारात हाच महत्त्वाचा मुद्दा होता. मात्र राज्याची सत्ता समीकरणं बदलली आणि शिवसेनेनं भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ केले. हीच बाब औरंगाबादच्या एका मतदाराला पटलं नाही.


VIDEO | Oath Ceremony | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हा सर्वोच्च आनंद, एकनाथ शिंदेंना अश्रू अनावर