मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा साखरपुडा आज मुंबईत पार पडला. मात्र या सोहळ्याला अमितचे काका, म्हणजे राज यांचे चुलत बंधू, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला. उद्धव ठाकरे यांना अमित यांच्या साखरपुड्याचं निमंत्रणच दिलं नसल्याची माहिती आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 2006 मध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतर दोघा भावंडांमध्ये वितुष्ट आलं.

गेल्या 11 वर्षांमध्ये ठाकरे बंधू फारसे समोरासमोर आलेले नाहीत. दोघं पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा अनेक वेळा झाल्या, मात्र ते प्रत्यक्षात उतरलं नाही. महापालिका निवडणुकांपूर्वी राज यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यास दिलेला प्रस्तावही धुडकावण्यात आला. त्यानंतर दोघांचे संबंध पुन्हा ताणले गेले.

नाही म्हणायला, उद्धव ठाकरे यांचं प्रकृती अस्वास्थ्य, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन, यासारख्या काही मोजक्या कौटुंबिक क्षणांना दोघं भाऊ एकत्र आले. त्यामुळे अमित ठाकरेंच्या साखरपुड्यासारख्या आनंदाच्या आणि वैयक्तिक सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाला असेल, अशी अटकळ बांधली गेली.

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यापैकी कोणीही साखरपुड्याला हजर नव्हतं. आता, अमित ठाकरेंच्या लग्नाचं निमंत्रण उद्धव यांना दिलं जाणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा संपन्न


अमित आणि मिताली यांची जुनी ओळख आहे. याच ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि आता लवकरच विवाहबंधनात होत आहे.
विशेष म्हणजे, राज ठाकरेंच्या लग्नाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून दोघांचा साखरपुडा आयोजित करण्यात आला.


कोण आहे मिताली बोरुडे?


मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. फॅड इंटरनॅशनलमधून तिने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांची ती मुलगी आहे.

राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली चांगल्या मैत्रिणी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.


अमित ठाकरे राजकारणापासून अलिप्त


अमित ठाकरेही तसे राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरेंप्रमाणे ते फार सक्रीय नाहीत. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेचा जोरदार प्रचार केला होता. अमित ठाकरेंनी मुंबईतील पोद्दार कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.