कल्याण: निवडणुकीची कामं करण्यास नकार देणाऱ्या कल्याणच्या 48 शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याविरोधात शिक्षक संघटना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.
दिवसभर शाळेत मुलांना शिकवून शाळा सुटल्यावर शिक्षकांना निवडणुकीची कामं करण्यास सांगण्यात आलं होतं. ज्यात मतदार याद्यांच्या पुनर्परिक्षण, मतदारांचे फोटो जमा करणे, आशा कामांचा समावेश होता.
मात्र दिवसभराच्या मानसिक आणि शारीरिक थकव्यानंतर रात्रीपर्यंत ही कामं करण्यास शिक्षकांनी आणि विशेषतः महिला शिक्षकांनी नकार दिला. त्यामुळं केडीएमसीच्या निवडणूक विभागाने विविध खासगी शाळांच्या 48 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याविरोधात शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. आज याबाबत कल्याणमध्ये शिक्षक सेना आणि शिक्षक परिषद यांच्यावतीने या शिक्षकांची बैठक घेण्यात आली. यावेळी निवडणूक विभागाच्या या कारभारावर रोष व्यक्त करण्यात आला.