मुंबई : तुमच्या एका हातात विषाचा प्याला आहे, दुसऱ्या हातात अमृताचा, तुम्ही कोणता घ्याल? असा भावनिक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत चर्चेसाठी बोलावलेल्या शिवसेना आमदार-खासदारांच्या बैठकीत केला. तुमच्यासमोर मी दोन प्याले ठेवले. एकात विष आणि दुसऱ्यात पाणी, तीर्थ किंवा अमृत आहे. त्यातला कुठला प्याला घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर, तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, असं उत्तर उपस्थित आमदार-खासदारांनी एकमताने दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेशी युती करण्याबाबत सकारात्मक असल्याचं दिसत आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी वारंवार स्वबळाचा नारा दिला आहे. त्यातच, त्यांनी पुन्हा विचारलेल्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच कौल दिला. एकीकडे युतीचा निर्णय लवकर घ्या, अन्यथा लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका लावू, असा इशारा भाजपने शिवसेनेला दिल्याची माहिती मिळत होती. मात्र असं कोणतंही अल्टिमेटम दिलं नसल्याचा दावा शिवसेनेतल्या नेत्यांनी केला होता. एबीपी माझा - मूड महाराष्ट्राचा (ऑक्टोबर 2018) महाराष्ट्राचा कौल कुणाला? (जागा –  सर्व पक्ष स्वतंत्र लढले तर) भाजप+  : 23 काँग्रेस+ : 14 राष्ट्रवादी काँग्रेस : 6 शिवसेना : 5 ------------------------------------------ महाराष्ट्राचा कौल कुणाला? (जागा – युती विरुद्ध आघाडी जसं आहे तसं) एनडीए  : 34 यूपीए  : 14