मुंबई: ‘उत्तर प्रदेशमध्ये योगी आणि राज्यात निरुपयोगी सरकार आहे.’ अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (बुधवार) केली होती. त्यानंतर आज आमदारांच्या बैठकीत त्यांनी ‘निवडणुकीच्या तयारीला लागा.’ असे आदेश दिले आहेत.

मुंबईमध्ये आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. जीएसटीसाठी येत्या 20 तारखेला अधिवेशन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. जीएसटीच्या मुद्द्याला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. मात्र, महापालिकेची स्वायत्ता अबाधित राहावी अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.

 भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान:

भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेनं पुन्हा एकदा तयारी केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर प्रश्नांसाठी आता शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

संघर्षयात्रा आणि संवाद यात्रेपाठोपाठ आता शिवसेना शिवसंपर्क अभियान राबवणार आहे. हे अभियान मराठवाड्यापासून सुरु होणार आहे. त्यानंतर विदर्भ, उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, कोकण इथंही हे अभियान राबवलं जाणार आहे.

‘...तर शिवसेनेला पुनर्विचार करावा लागेल’

दरम्यान, जीएसटी संदर्भात शिवसेनेने आपली भूमिका नेहमी स्पष्ट केली आहे. ‘जर लाचार होऊन महापालिकेला राज्य आणि केंद्र सरकारच्या दरबारी जाण्याची वेळ येणार असेल तर शिवसेनेला विचार करावा लागेल. सुरूवातीपासून आमची हिच मागणी आहे की महापालिका ही अबाधित राहिली पाहिजे. भिकेचा कटोरा घेऊन सरकारच्या दारी उभं रहावं लागणार असेल, तर शिवसेनेला पुनर्विचार करावा लागेल.’ असा इशाराही उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे.

संबंधित बातम्या:

यूपीत योगी सरकार, महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार : उद्धव ठाकरे

पाकड्यांशी 'मन की नाही तर गन की बात' करा : उद्धव ठाकरे

राजू शेट्टी 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंशी दीड तास चर्चा

'..म्हणून मोहन भागवतांचं नाव राष्ट्रपतीसाठी सुचवलं'